Farmer Success Story:- शेती करायची म्हटली म्हणजे नुसते पिकांची लागवड करून चालत नाही. कुठल्याही पिकापासून जर तुम्हाला भरघोस असे उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला अगदी शेतीची पूर्व मशागती पासून तर पीक लागवड,
लागवडीनंतरचे अंतरमशागतीचे विविध महत्त्वाचे टप्पे व या टप्प्यांमध्ये करावे लागणारे रोग व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन आणि काढणी व काढणी पश्चातचे व्यवस्थापन इत्यादी सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे असते व तेव्हा कुठे कुठल्याही पिकापासून भरगोस असे उत्पादन आपल्याला मिळत असते.
यासोबतच वेळेत व्यवस्थापन म्हणजेच पिकाच्या संबंधित असलेले कुठलेही काम अगदी वेळेच्या वेळी पूर्ण होणे देखील तितकेच गरजेचे असते. मग ते पारंपारिक पिके असो की फळपिके अथवा भाजीपाला पिके यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करणे गरजेचे असते.
तसेच तंत्रज्ञानाचा वापर हा एखादा महत्त्वाचा दुवा असून त्यामुळे कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळवणे शक्य झालेले आहे.
याच मुद्द्याला धरून जर आपण सांगली जिल्ह्यातील माडग्याळ या गावचे तरुण प्रयोगाशील शेतकरी पांडुरंग सावंत यांचे जर उदाहरण घेतले तर या शेतकऱ्याने एका एकरमध्ये तब्बल 43 क्विंटल बाजरीचे उत्पादन घेऊन जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात विक्रम केला आहे.
कशी केली पांडुरंग सावंत यांनी ही अशक्य गोष्ट शक्य?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील माडग्याळ येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सावंत यांनी 40 गुंठे क्षेत्रामध्ये बाजरीचे उत्पादन घेतले होते. त्यांच्या गावच्या परिसरातील जमीन पाहिली तर ती प्रामुख्याने खडकाळ आहे व त्या ठिकाणी नेहमी शेतकरी बाजरी सारखे इतर पिकांचे उत्पादन घेत असतात.
परंतु याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की पारंपारिक पद्धतीने जेव्हा वडील शेती करायचे तेव्हा या शेतामध्ये दहा ते बारा क्विंटल बाजरी निघत होती. सगळ्या शेतकऱ्यांची जवळपास हीच परिस्थिती होती व बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेऊन कृषी विभागाच्या माध्यमातून जत तालुक्यातील माडग्याळ येथे खरीप बाजरी अभियान राबवण्याचे ठरवले व ते अभियान राबवले गेले.
या अभियानांतर्गत माडग्याळ गावामध्ये शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात आला व 25 एकर बाजरी उत्पादनाचा कृषी विभागाने प्रयोग केला. या प्रयोगामध्ये सावंत देखील सहभागी झाले होते व ठिबक सिंचनावर बाजरी पिकवण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग होता असे त्यांचे म्हणणे आहे.
या गटामधील जेवढे शेतकरी होते तेवढ्या शेतकऱ्यांना पंढरपूर येथे ट्रेनिंग देण्यात आले व त्यानुसार ठिबक सिंचनावर बाजरीची लागवड करून अशा पद्धतीने भरघोस उत्पादन त्यांनी मिळवले. त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये टाटा कंपनीचा 7872 हा बाजरीचा वाण लागवडीसाठी वापरला.
यामध्ये त्यांना 43 क्विंटल विक्रमी उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे ते पदवीधर असून शेतीव्यतिरिक्त दुष्काळ मुक्तीसाठी पाणी फाउंडेशनचे जे काही उपक्रम असतात त्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात देखील सक्रिय आहेत. तसेच शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा असून ते यशस्वी देखील झाले आहेत.
राज्यपालांच्या हस्ते झाला सत्कार
पांडुरंग सावंत यांच्या एक एकर बाजरी लागवडीतून घेतलेल्या 43 क्विंटल उत्पादनाची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने देखील दखल घेतली व बाजरी उत्पादन स्पर्धेत सर्वसाधारण गटात त्यांना राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.