Success Story:- जर आपण बऱ्याच व्यक्तींचे किंवा प्रत्येक जणांची म्हटली तरी मानसिक स्थिती पाहिली तर ती अशी असते की स्थिर जीवनाचा मार्ग किंवा स्थिर आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सोडून दुसऱ्या एखाद्या व्यवसायाचा मार्ग निवडून जोखीम पत्करायला सहजासहजी कोणी तयार नसतात.
बहुतांशी जर आपण पाहिले तर उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर जीवन स्थिरस्थावर जगण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. परंतु या गोष्टीला काहीजण अपवाद असलेले दिसून येतात.
आपण ऐकले किंवा वाचले असेल की अनेक जणांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांना लाथ मारून व्यवसाय करण्याची जोखीम पत्करली व कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर नोकरीपेक्षा व्यवसाय मध्ये यशस्वी देखील होऊन दाखवले.
अगदी याच पद्धतीने आपल्याला ओडीसा राज्यातील कालाहंडी जिल्ह्यातील महापात्रा या दांपत्यांचा विचार करणे गरजेचे आहे. कारण यांनी बेंगलोर या ठिकाणी असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि शेळीपालन व्यवसाय सुरू केला.
परंतु या शेळीपालन व्यवसायाला त्यांनी अनोख्या पद्धतीने सुरुवात केली व या माध्यमातून स्वतः ते लाखो रुपयांचा नफा तर मिळवत आहेतच परंतु हजारो लोकांना रोजगार देण्याची किमया साध्य केली आहे.
महापात्रा दांपत्याची शेळीपालनातील यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओडिसा राज्यातील कालाहंडी जिल्ह्यातील रहिवासी असलेले जयंती आणि बिरेन महापात्रा यांनी बंगलोरमध्ये असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेळीपालन व्यवसाय सुरू केला.
साधारण दहा वर्षांपूर्वी बेंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत ते चांगल्या पगारावर काम करत होते. परंतु यामध्ये मन न लागल्यामुळे ते गावाकडे आले. गावी आल्यानंतर मात्र त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये शेळीपालन व्यवसाय करायला सुरुवात केली.
परंतु शेळीपालन व्यवसायाला सुरुवात करताना मात्र त्यांनी माणिकस्तू ऍग्रो या स्टार्टअप अंतर्गत हा व्यवसाय सुरू केला. या माध्यमातून त्यांनी गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाच परंतु जवळपास 40 पेक्षा जास्त गावातील लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले.
विशेष म्हणजे या दांपत्याने गोट बँकेची स्थापना केली व सामुदायिक शेतीच्या माध्यमातून शेळीपालनाला प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे त्यांची माणिकस्तू ऍग्रो ही सध्या महाराष्ट्रातील फलटण येथील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेशी संबंधित आहे.
हा व्यवसाय सुरू करण्याअगोदर जेव्हा त्यांनी नोकरी सोडली आणि शेती करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी अनेक कृषी कंपन्या तसेच डेअरी व पोल्ट्री उद्योगांना भेटी दिल्या.
यातूनच त्यांनी माणिकस्तू ऍग्रो फार्मची सुरुवात केली. साधारणपणे ही सुरुवात 2015 मध्ये झाली व आज या अग्रो फार्मशी 1000 शेतकरी जोडले गेलेले आहेत.
गोट बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जातात शेळ्या व हे आहे व्यवसायाचे अनोखे स्वरूप
त्यांच्या या स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक वर्ष वयाच्या दोन मादी शेळ्या दिल्या जातात व या शेळ्या एका वर्षात कोकरांना जन्म देतात. जेव्हा शेळी व्यायते तेव्हा ते शेतकरी 50% नवीन शेळ्या या गोट बँकेमध्ये परत करतात.
या गोट बँकेमध्ये 40 पशुवैद्यक असून त्यापैकी 27 स्थानिक महिला व तरुण आहेत. या तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यांच्या गोट बँकेतील शेळ्यांची नियमित तपासणी तसेच लसीकरण केले जाते. तसेच मार्केटचे व्यवस्थापन जयंती आणि बिरेन हे दोघे मिळून करतात.
शेळीपालनातून शेळीचे खत तसेच दूध व तूप अशी उत्पादने देखील ते तयार करतात व देशाच्या विविध भागात विकतात. सध्या त्यांच्या या सालेभाटा येतील माणिकस्तु फार्ममध्ये पाचशे शेळ्या असून त्यांचे हे व्यवसायाचे मॉडेल
त्यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॉ. निंबकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरू केलेले आहे. ते त्यांच्या स्टार्टअपमध्ये कंत्राटी शेतीच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना देखील सहभागी करून घेत आहेत. त्यामुळे बरेच कुटुंबे शेळीपालन व्यवसायातून आता आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झालेली आहेत.