शेतीमध्ये आता तंत्रज्ञान आणि विविध पिकपद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होताना दिसून येत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणावर फळबाग आणि फुल शेती तसेच भाजीपाला पिकांकडे वळले आहेत व त्यासोबतच शेळी पालन तसेच पशुपालन सारखे जोडधंदे तंत्रज्ञानाच्या मदतीने करू लागल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होताना आपल्याला दिसून येत आहेत.
परंतु या व्यतिरिक्त काही शेतकरी काहीशा वेगळ्या मार्गाने जाताना देखील दिसून येत असून उपयुक्त आणि चांगली मागणी असणाऱ्या वृक्षांच्या लागवडीकडे देखील बरेच शेतकरी वळले आहेत. महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर वृक्ष लागवडीमध्ये साग तसेच निलगिरी यासारख्या झाडांच्या लाकडांना खूप मोठी मागणी असल्यामुळे या वृक्षांची लागवड कालांतराने खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना देऊन जाते.
नेमकी हीच वनशेतीची बाजू डोळ्यासमोर ठेवून गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथील शेतकरी सुरेंद्र तावडे हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तीन एकर जमिनीमध्ये निलगिरीची लागवड केली व लाखो रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून ते घेत आहेत.
सुरेंद्र तावडे यांनी निलगिरी शेतीतून कमावले लाखो रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील मेंढेबोडी( वैरागड) या गावचे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले कॅप्टन सुरेंद्र तावडे यांचे तीन एकर शेत जमीन आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु ही पारंपरिक पिके न घेता सुरेंद्र तावडे यांनी शेताच्या बांधांवर व शेतामध्ये सन 2018 मध्ये निलगिरीची लागवड केली व आता ही झाडे पाच वर्षाची झाली असून त्यांची उंची दहा ते बारा फुटांपर्यंत झालेली आहे.
मागच्या तीन महिन्यापूर्वी मोकळ्या जागेतील काही निलगिरीच्या झाडांची तोडणी केली व एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न त्यांना मिळाले. आपल्याला माहित आहेस की निलगिरीच्या लाकडांना बल्ले किंवा फाट्यांसाठी बाजारामध्ये मोठी मागणी असते. दोन ते तीन महिन्यात कटाई केलेले ही झाडे आता पुन्हा बहरली असून दोन वर्षात त्यांचे उत्पन्न या माध्यमातून दुप्पट होणार आहे.
निलगिरीची झाडांची लागवड का आहे फायद्याची?
विशेष म्हणजे वनशेतीसाठी ज्याही झाडांची लागवड केली जाते त्या झाडांसाठी रासायनिक खते तसेच कीटकनाशके इत्यादींसाठी शेतकऱ्यांना अजिबात खर्च करावा लागत नाही. या प्रकारची शेती दोन वर्षांनी कमी जागेमध्ये लाखोंचे उत्पन्न देते व त्यामुळे ही एक नफ्याची शेती आहे.
वनशेतीमध्ये फक्त वन वृक्षाचे गुणवत्ता व जमिनीचा प्रकार यानुसार निवड करणे खूप गरजेचे आहे. अशाप्रकारे जर व्यवस्थापन केले तर वनशेती खूप फायद्याची ठरू शकते. सुरेंद्र तावडे यांनी 2018 मध्ये निलगिरीची लागवड केली होती व तेव्हापासून त्यांनी खत किंवा पाणी तसेच फवारणी व इतर गोष्टीसाठी खर्च केलेला नाही.
चार वर्षांनी त्यांनी पहिली काटनी केली व तेव्हा त्यांना एक लाख रुपये उत्पन्न मिळाले. परंतु आता दर दोन वर्षांनी कटिंग करून प्रत्येक वर्षापेक्षा दुपटीने या उत्पन्नात वाढ होत राहील व विशेष म्हणजे यासाठीचा खर्च मात्र शून्य राहिल अशी देखील माहिती सुरेंद्र तावडे यांनी दिली.