घुले ताईंची शेती आहे लयभारी! खजूर, ड्रॅगन फ्रुट आणि सफरचंदातून घेतात वर्षाला लाखोंचे उत्पन्न, वाचा यशोगाथा

Ajay Patil
Published:

महिला म्हटले म्हणजेच फक्त चूल आणि मूल ही जी काही संकल्पना होती ती आता काळाच्या ओघात कधीच मागे पडलेली आहे. असे एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये महिला काम करत नाहीत.अनेक उच्च पदांवर आज महिला कार्यरत असून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा महिलांनी देशातच नाही तर जगात उमटवलेला आहे.

याला शेती क्षेत्र देखील अपवाद नाही. आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येईल की,शेती क्षेत्रामध्ये देखील महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या पिकांचे लागवडीतून शेती क्षेत्रामध्ये देखील उंच अशी भरारी घेण्यात महिला यशस्वी ठरताना आपल्याला दिसून येत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण  बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असलेल्या विजया गंगाधर घुले या महिला शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल असे त्यांचे कर्तुत्व आहे.

 विजया घुले शेतीतून कमावतात लाखो रुपये

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेल्या विजया गंगाधर घुले या महिला शेतकरी असून त्यांनी पारंपारिक शेतीला तिलांजली देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली आहे.

विजयाताई या मिश्र स्वरूपाची शेती करतात व 2016 मध्ये त्यांनी या मिश्र शेतीला सुरुवात केली. त्यांनी मिश्र शेती सुरू करायचा विचार केला तेव्हा त्यांनी सर्वात आधी अर्धा एकर ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा विचार केला व  लागवड केली. ड्रॅगन फ्रुटची लागवड यशस्वी केल्यानंतर त्यांना आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली व त्यांनी खजूर आणि सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

आता यापैकी सफरचंद हे पीक म्हटले म्हणजे थंड प्रदेशात येणारे पीक आहे परंतु तरी देखील त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचे धाडस केले. खजुराची 80 झाडे आणि सफरचंदाची तब्बल 240 रोपे लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तीन एकर क्षेत्र हे सगळे मिश्र पिकांखाली त्यांनी आणले.

परंतु अखंड मेहनत तसेच कष्टाच्या जोरावर त्यांनी खजूर आणि सफरचंदाचे पीक देखील यशस्वी केले व त्या माध्यमातून ते आज भरघोस उत्पन्न मिळवत आहेत.

 खजुराच्या ऐंशी झाडांनी पहिल्याच वर्षी दिले अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न

विजयाताईंनी खजुराचे 80 झाडांची लागवड केलेली होती व त्या माध्यमातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा झाला. तंत्रज्ञान आणि उच्च व्यवस्थापनाचा वापर करून त्यांनी प्रत्येक झाडापासून पहिल्याच वर्षी 70 ते 120 किलोपर्यंत खजुराचे उत्पादन घेतले व बाजारपेठेत 70 ते 100 रुपये दराने त्याची विक्री केली.

तसेच किरकोळ विक्री 160 ते 200 रुपये प्रति किलो प्रमाणे केली. याचे परिणीती अशी झाली की पहिल्याच वर्षी त्यांनी 80 झाडांपासून अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले व पुढच्या वर्षी प्रती झाड दीडशे ते पावणे दोनशे किलो पर्यंत खजुराचे उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

एवढेच नाही तर सर्व फळांमधून म्हणजे ज्या सगळ्या मिश्र शेतीतून पुढच्या वर्षी एकूण तीन एकर क्षेत्रामधून कमीत कमी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.

यामध्ये ड्रॅगन फ्रुट चार ते पाच लाखापर्यंत व खजूर चार ते पाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न देऊ शकते असा विश्वास त्यांना आहे. विशेष म्हणजे विजयाताईंच्या या शेतीमधील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 2022-23 चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील केलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe