बँकॉक : थायलंडच्या ईशान्येकडील कोरात शहरामध्ये एका माथेफिरू सैनिकाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जवळपास १७ जण ठार झाले, तर १५ हून अधिक जण जखमी झाले. माथेफिरूने अनेक जणांना शॉपिंग मॉलमध्ये ओलीस ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून सैनिकाला पकडून बंधकांना सोडवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सैनिकाने सुरुवातीला अन्य एका सैनिकाची हत्या केल्यानंतर मॉलच्या पार्किंग परिसरात बेछूट गोळीबार केला.
अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. गोळीबार, स्फोटाचे आवाज ऐकून लोक सैरावैरा पळत होते. काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये किचन टेबलखाली आश्रय घेतला.
या गोळीबारात जवळपास १७ जण ठार झाल्याचे रॉयल थाई पोलिसांनी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल कोंगचीप तंत्रवानीच यांनी संशयित हल्लेखोराची ओळख जक्रपंथ थॉम्मा अशी केली आहे. हल्लेखोर सैनिकाने हल्ल्याचे फेसबुक लाइव्हसुद्धा केले.