अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि नगरसेवकांच्या पुढाकारातून साईमंदिरासमोर असलेल्या नगर-मनमाड रोडलगतच्या त्रिकोणातील मोकळ्या जागेत भव्य असा बगिचा, लहान मुलांना गार्डन आणि भव्य अशी कोरीव व अप्रतीम साईबाबांची मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे.
त्यामुळे शिर्डीच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गोंदकर म्हणाले, शिर्डी शहरातील त्रिकोण परिसर विकसित करुन शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना ग्रामस्थांना अंतरिक समाधान मिळेल,
या दृष्टिकोनातून हालचाली सुरु असुन त्या धर्तीवर काल शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक विद्यालयात नामांकीत कलाकारांना बोलावून त्यांच्याकडून या मुर्तीचे रेखाटन करुन घेण्यात आलेय. यातील स्पर्धकांची गुणवत्ता तपासून तीन स्पर्धकातून निविदा उघडून एकास हे काम दिले जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.
शिर्डी शहरात वर्षाकाठी काही कोटी भाविक साई दर्शनासाठी येत असतात. शहराचे सुशोभिकरण, वृक्षारोपण, भव्य दिव्य रस्ते, स्वच्छता यासह विविध विकासाभिमुख उपक्रम माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातुन राबविण्यात येत आहेत.
शिर्डी शहरातील अर्थकारण वाढले पाहिजे. साईभक्त शिर्डीत थांबला पाहिजे, या दृष्टीकोनातून आणि बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी अतीशय नियोजनबद्ध पद्धतीने शिर्डी नगरपंचायतने विकासकामे हाती घेतली आहेत, अशी माहिती गोंदकर यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम