कोपरगावमधील रसराज मेडिकल दुसर्‍यांदा फोडण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहरातील बिरोबा चौक येथील रसराज मेडिकल दुसर्‍यांदा अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता.14) पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे एकीकडे कोविडचे संकट असताना दुसरीकडे चोर्‍या वाढल्याने कोपरगाव शहरवासियांसह व्यापार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शैलेश केशवराव साबळे यांच्या मालकीची शहरात रसराज नावाची दोन मेडिकल आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी बिरोबा चौक येथील मेडिकल फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे साठ-सत्तर हजार रुपये लांबविले होते.

त्याचा तपास अद्याप बाकी असतानाच पुन्हा सोमवारी पहाटे चोरट्यांनी मेडिकल फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.

दरम्यान, महिनाभरापूर्वी त्यांच्याच मालकीचे संभाजी चौक येथील मेडिकल फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळास भेट देवून पाहणी केली.

याप्रकरणी तन्मय सचिन साबळे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुरनं.१८०/२०२१ भादंवि कलम ३७९, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सततच्या घटनांमुळे शहरवासियांसह व्यापार्‍यांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe