मोठी बातमी ! नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यांना आज झालेल्या सुनावणीमध्ये १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या हल्ला प्रकरणी सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मात्र न्यायालयाने आजपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टात केलेला अर्ज मागे घेत नितेश राणे शरण गेले होते.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे सुमारे तीन आठवडे अज्ञातवासात राहून अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. देशातील सर्वोत्तम वकिलांची फौजही त्यासाठी झटत होती.

मात्र, पोलिसांकडे असलेले पुरावे आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेता ही लढाई यशस्वी होणार नाही, असे दिसू लागताच नितेश यांनी उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज मागे घेतला़.

तसंच ते न्यायालयाला शरणही आले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले.

स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे ते सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत.