अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसत असून, दीड वर्षांत कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे.
त्यामुळे आपला खर्च कसा भागवायचा ही समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसले आहे. पण आपण आता गप्प बसून चालणार नाही. तुमचा सिलिंडर आमच्या घराच्या सुख-शांतीला आग लावत असेल तर आंदोलन छेडण्याशिवाय तुम्ही आमच्यासमोर पर्यायच ठेवला नाही.
राष्ट्रवादी या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. आज महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस गांजला आहे.
त्यात आता गृहिणीचे देखील बजेट नरेंद्र मोदींच्या भाजपाशासित केंद्र सरकारने कोलमडवले आहे. ज्यावर सर्वसामान्य माणसाच्या घरातील स्वंयपाक होतो तो एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला आहे.
जगावं की मरावं या प्रश्नावर आता ‘मन की बात’चं उत्तर दिसतंय की सर्वसामान्य माणसाने मरावंच, असे म्हणत ना. पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीवर ताशेरे ओढूनही मोदी सरकार ढिम्म हलायला तयार नाही.
पेट्रोल शंभरीपार गेले, तेव्हा लोकांनी त्यावर विनोद केले. सोशल मीडियावर मिम्स झाले. पण केंद्र सरकारने काहीच उपाययोजना केली नाही.
केवळ निवडणुकीपुरतंच गिमिक करायचं त्या त्या राज्यात निवडणुका लागल्या की इंधर दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की आपल्या आश्वासनांचा विसर पडत सर्वसामान्य माणसांना वाऱ्यावर सोडायचं हा भाजपाचा खाक्या असल्याचे पाटील म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम