अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दि.२२ (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२१ रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण ३४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
असे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील ३४ उपकेंद्रावर एकूण १२४५६ उमेदवार परिक्षेस बसलेले आहेत. या उपकेंद्रावर (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी -९ , भरारी पथक प्रमुख-२, वर्ग १ संवर्गातील उपकेंद्र प्रमुख -३४ अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, मदतनीस असे विविध वर्ग ३ संवर्गातील ११३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर सकाळी ८.३० वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षेच्या दोन सत्राच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २ जानेवारी २०२२ होणा-या मात्र अपरिहार्य कारणामुळे रद्द झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता निर्गमित करण्यात आलेली प्रवेशपत्र २३ जानेवारी २०२२ रोजी होणा-या राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता ग्राहय धरण्यात येणार आहेत.
उमेदवार यांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखान साहित्य इ. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थी उमेदवार यांनी मुखपट्टी (मास्क), हातमोजे व सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य आहे.
मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर इ. परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
या सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारास सदर परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ,
फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ (३) लागू करण्यात आलेले आहे.असेही श्री.संदीप निश्चित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम