जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा उगम चीनच्या वुहान शहरातून झाला. चीनने याची वेळीच माहिती दिली असती तर खूप मोठा अनर्थ टळला असता.
याचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेने ‘चीनला हिशोब चुकता करण्यास तयार रहा’, अशी धमकीही दिली. भारतानेही चीनला घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी सगळ्या गोष्टी असजून उघड्या केल्या नाहीत.
जगातील अन्य देशांनी मात्र चीनविरोधात आघाडी उघडली आहे. एकीकडे चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यासारखे देश आहेत, तर दुसरीकडे कोरोना विषाणूची झळ सोसणारे देश आहेत.
पाकिस्तानला चीनकडून बळ मिळते आणि उत्तर कोरिया आणि चीन यांची ‘मैत्री’सर्वश्रूत आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यामुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया यांना टेन्शन आहे.
त्यामुळे भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि इस्राईल देश एकत्र आले आहेत. चीनची विस्तारवादी भूमिका जगापासून लपून राहिलेली नाही.
जगभरातील छोट्या-छोट्या देशांना आधी मदत करून त्यांच्या भूमीत सैन्यतळ उभारण्यात चीनचा हातखंडा आहे. चीनचे दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगितला असून तिथे कृत्रिम बेटही तयार केले आहे.
या ठिकाणी सैन्यतळ उभारून चीन आजूबाजूच्या देशांवर दादागिरी करत आहे. याला अमेरिकेसह, जपान, व्हिएतनाम या देशांनी विरोध केला आहे. चीनच्या याच दादागिरी आणि विस्तारवादी भूमिकेचा हिशोब त्याच्याकडे मागितला जाईल.
चीनच्या या वृत्तीला आळा घालण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून भारत, ब्राझील, इस्राईल, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया एकत्र आले आहेत.
या सात देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी ही बैठक बोलावली होती.
या बैठकीला सातही देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित होते आणि कोरोना विषाणूचा एकत्र सामना करण्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच यावेळी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने चीनच्या भूमिकेवर संशय उपस्थित करत चीनला कठोर संदेश दिला.