लोणी बुद्रूक ग्रामपंचातीला राज्‍यस्‍तरीय व्‍दितीय क्रमांकाचा २० लाख रुपयांचा पुरस्‍कार जाहीर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्‍यवस्‍थापनाचा उत्‍कृष्‍ठ दर्जा व गावात स्‍वच्‍छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्‍यामुळे सन २०१७-१८ मधील संत गाडगे बाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत लोणी बुद्रूक ग्रामपंचातीला राज्‍यात व्‍दितीय क्रमांकाचा २० लाख रुपयांचा पुरस्‍कार जाहीर झाला असून,

मुख्‍यमंत्री ना.उध्‍दव ठाकरे यांच्‍या हस्‍ते गुरुवार दि.१ जुलै रोजी दुपारी १ वा. ऑनलाईन पध्‍दतीने या पुरस्‍काराचे वितरण होणार आहे. ग्रामीण भागाच्‍या विकासात पंचायत राज संस्‍थांचे योगदान मोठे आहे.

ग्रामीण विकासाच्‍या सर्व योजना पंचायतराज संस्‍थामार्फत राबविल्‍या जातात. लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच ग्राम स्‍वच्‍छता व विविध राबविलेले सामाजिक उपक्रम यामुळे राष्ट्रीय व राज्‍य स्‍तरावर ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचा पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे.

करोना संकटाचे गांभिर्य लक्षात घेता अहमदनगर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयातील एनआयसी केंद्रात हा पुरस्‍कार वितरण समारंभ ऑनलाईन पध्‍दतीने संपन्‍न होणार आहे.

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली व जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी वेळोवेळी विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी,

वैयक्तिक लाभाच्‍या योजनांसाठी अंमलबजावणी होण्‍याच्‍या दृष्‍टीने केलेले मार्गदर्शन, पाठपुरावा आणि तालुक्‍याच्‍या विकासाच्‍या संदर्भात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्व गावांना विकास प्रक्रीयेत सामावुन घेण्‍यासाठी केलेली प्रभावी कार्यवाही आणि शासन आपल्‍यादारी

या उपक्रमातुन वैयक्तिक लाभाच्‍या योजनांसाठी लाभार्थ्‍यांना केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच शासन स्‍तरावर लोणी बुद्रूक ग्रामंचायत गुणात्‍मकदृष्‍ट्या दर्जा राखण्‍यात यशस्‍वी झाला आहे.

केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांबरोबरच स्‍वच्‍छ भारत मिशन, घरकुल योजना, बायोगॅस , विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या उपक्रमांबरोबर वेळेवर घेण्‍यात आलेल्‍या मासिक सभा, सामाजिक बांधिलकीतुन प्‍लॅस्‍टीक बंदी,

बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, आरोग्‍य विषयक कार्यशाळा, पर्यावरण पुरक कार्यक्रम, हागणदारी मुक्‍त गाव अशा विविध योजना ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून सातत्‍याने राबविल्‍या जात आहेत. ग्रामपंचायतीला मिळालेल्‍या या पुरस्‍काराबद्दल माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील,

जिल्‍हा बॅंकेचे संचालक आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास आधिकारी श्रीमती कविता आहेर व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe