“विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत, आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था”

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी बारामतीमधून (Baramati) राज्य सरकार आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक आहे त्यावर सरकारच लक्ष नसल्यचा आरोपही त्यांनी केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिरोळमध्ये दुर्घटना घडली. माझा वर्गमित्र सुहास याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मात्र सरकारला याचे काहीही देणेघेणे दिसत नाही. केंद्र सरकारच्या धोरणामुळे रासायनिक खतांचे (Chemical Fertilizers) दर वाढले आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. टनामागे 214 रुपये खर्च वाढला आहे. उसाचा दर आता परवडत नाही असे म्हणत शेट्टी यांनी हल्लाबोल चढवला आहे.

राजू शेट्टी विरोधकावरही बरसले आहेत. ते म्हणाले, की कोरोना काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. आरोग्य, म्हाडा पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हे प्रश्न आपल्यासमोर आहेत.

मात्र विरोधक ईडी (ED), इन्कम टॅक्स (Income Tax) आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत. केंद्रातल्या अपयशावर विरोधक गप्प आहेत. तर राज्यातल्या प्रश्नावर इथले विरोधक गप्प आहेत. एकूणच आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारावरही टीका केली आहे. ज्यांनी 800 शेतकऱ्यांचा बळी घेऊन कृषी कायदे मागे घेतले, ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, त्यांच्यासोबत कसे जाणार, असा सवाल त्यांनी केला.

पवारसाहेब 10 वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी उसाबाबत योग्य निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. या ऊस उत्पादकांमुळेच त्यांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवाही टीका केली आहे. ते म्हणाले, 11 फेब्रूवारीला शरद पवार यांना पत्र लिहिले होते. विविध प्रश्न मांडले होते. सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता.

सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही पत्र लिहिले होते. शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय घेतले. मात्र कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला व्हायचा निर्णय घेतला असेही त्यांनी सांगितले आहे.