अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- पुणेरी पाट्या म्हटलं की चिमटे, ओरखडे आणि टोमण्यांची आतषबाजीच. त्यात आता निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय नेतेमंडळी आणि त्यांचे ‘कट्टर’ समर्थक यामध्ये गुंतलेले दिसून येत आहे.
अशाच एका पुण्यातील फ्लेक्सची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पुणे महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आणि सर्वच पक्षातील दिग्गजांनी आपापल्या परीने स्वत:चे ‘कर्तृत्व’ अर्थात ‘अस्तित्व’ दाखविण्यासाठी नव्या नव्या आयडीया शोधायला सुरुवात केली आहे.

शहरातील भाजपचे एक मोठे प्रस्थ असलेल्या नगरसेवक धीरज घाटे यांनी ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशा आशयाचा फ्लेक्स चाैकात लावला आहे. कसलीही मदत हवी असल्यास फोन करण्याचे आवाहन त्यांनी त्यात केले आहे.
मात्र, काही बिलंदर विरोधकांनी त्यांच्या या भल्या मोठ्या फ्लेक्सखाली दोन छोटे फ्लेक्स लावत ‘धीरज आम्हाला नाही तुझी गरज’ आणि ‘नको बापट नको टिळक पुण्याला पाहिजे नवीओळख’ : प्रभागातील मतदार.. असा चिमटा काढल्याने शहरात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.
या प्रकाराची चटकदार चर्चा सुरू असतानाच मनसेच्या साै. नलिनी व योगेश आढाव यांनी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या छायाचित्रांसह एक मोठा फ्लेक्स लावत नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
‘उठा उठा निवडणूक आली…गाजराची शेती लावण्याची वेळ झाली!! या मोती साबणाच्या जाहिरातीची आठवण करून देणाऱ्या मात्र चिमटे काढणाऱ्या ओळी सध्या नागरिकांना गुदगुल्या करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम