Maharashtra News:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री पानंद रस्ते योजना
व रोजगार हमी योजनेंतर्गत पानंद रस्ते कामात सुमारे वीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याची लक्षवेधी सूचना भाजपचे नेते, विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी मांडली होती.
त्याची दखल घेत सरकारने समिती नियुक्त करून चौकशीचा आदेश दिला आहे. अडीच वर्षांनंतर शिंदे विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आमदार झाले.
तर त्याच दरम्यान राज्यात सत्तातंर झाले. त्यामुळे शिंदे आणि पवार यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा टोकादार होताना दिसत आहे.
आमदार शिंदे यांनी सांगितले की, तक्रारीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी चार सदस्यीय समिती मार्फत सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
चौकशी करण्यासाठी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी या तीन अन्य सदस्यांचा चौकशी समितीत समावेश आहे.
नेमका काय प्रकार झाला याबद्दल शिंदे म्हणाले, कोट्यवधी रुपये खर्चाचे पानंद रस्ते करताना प्रत्यक्ष कोणतीही विहीत प्रक्रिया राबवली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या योजनेतून केलेली कामे अस्तित्वातील रस्त्यांपेक्षाही दर्जाहिन झालेली आहेत. झालेल्या कामाचे मोजमाप अंदाजे करून, ठेकेदारांना पैसे अदा करण्यात आले आहेत.
कामे करताना स्थानिक ग्रामपंचायतीला याबाबत काहीही कल्पना देण्यात आलेली नाही. निविदा प्रक्रीया न राबवता कामाचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खिरापत वाटल्यासारखे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी होवूनही केवळ लोकप्रतिनिधीच्या दबावातून स्थानिक प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लश केले होते, असा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे.