सिडनी : गत काही महिन्यांत वणव्यामुळे होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर वरुणराजाची कृपा झाली असून, सततच्या पावसाने अनेक भागांत वणवा नियंत्रणात आला आहे. सिडनी शहरात ३० वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली.
पावसामुळे दुष्काळग्रस्त पूर्व भागालाही मोठा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियात वणव्यामुळे धुमसत असलेली भीषण आग मुसळधार पावसामुळे काही दिवसांमध्ये आटोक्यात येणार असल्याचा दावा सोमवारी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
सिडनी शहरात ३० वर्षांपूर्वी विक्रमी पावसाची नोंद झाली होती. तीन दशकांनंतर पहिल्यांदाचा सिडनीत विक्रमी पाऊस पडत आहे. गत चार दिवसांत सिडनीत ३९१.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यापूर्वी १९९० साली या शहरात सर्वाधिक ४१४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे तब्बल ५ लाख हेक्टर जंगलातील वणवा आटोक्यात येत आहे. वणव्यामुळे त्रस्त झालेल्या सिडनीच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ज्या भागातून भीषण वणव्याला सुरुवात झाली त्या न्यू साऊथ वेल्स व क्विन्सलँड राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.