अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : मित्रांनो भारत विविधतेने नटलेला आणि संस्कृतीने सजवला गेला बहुभाषी बहुरंगी देश म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे.
देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात वेगवेगळ्या रूढी परंपरा आजही कायम आहेत यामुळे जगाच्या पाठीवर भारताने आपली एक वेगळी आणि महत्त्वपूर्ण अशी छाप सोडली आहे.

खरं पाहता या 21व्या शतकात पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी संस्था तसेच हवामानशास्त्रज्ञ खाजगी संस्था या यशस्वीपणे कार्य पाहत आहेत.
मात्र आजही आपल्या महाराष्ट्रात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात आतुरतेने हवामानाच्या अंदाजासाठी वाट पाहिली जाते ती भेंडवळची भविष्यवाणीची.
विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची या भेंडवळची भविष्यवाणी कडे नजर लागलेली असते. अखेर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली भेंडवळची भविष्यवाणी सार्वजनिक झाली आहे.
ही भविष्यवाणी केवळ पावसाचा अंदाज वर्तवते असे नाही तर सर्वसाधारण भारत देशाचे वर्ष कसे जाईल याबाबत या भविष्यवाणीत भाकीत सांगितले जाते.
मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, यामध्ये घट मांडणी करून भाकीत सांगण्याची रूढी आहे. नुकत्याच सांगितलेल्या या भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, येत्या हंगामात अर्थात या वर्षी पावसाळा हा सर्वसाधारण राहणार असून पावसाळ्यातील पहिल्याच महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
याशिवाय भविष्यवाणीत सांगितले गेले की दुसऱ्या महिन्यात पाऊस हा कमी पडेल मात्र तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात भरपूर पावसाची शक्यता या भविष्यवाणीत वर्तविली गेली आहे.
मात्र, भविष्यवाणीत अवकाळी पाऊस याही वर्षी धुमाकूळ माजवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब राहणार आहे.
याशिवाय भविष्यवाणीनुसार मानवावर रोगराईचे सावट आता कमी होणार आहे. निश्चितच भविष्यवाणी नुसार चांगला पाऊस होणार असल्याचे सांगितले गेले आहे मात्र या सोबतच पिकांची नासाडी अवकाळी पावसामुळे होऊ शकते असे देखील भाकीत सांगितले गेले आहे.
याशिवाय भारतात यावर्षी आर्थिक संकट येऊ शकते असे भाकीत सांगितले गेले असून परकीय सत्ता भारताला नाहक त्रास देऊ शकतात अशी देखील भाकणूक करण्यात आली आहे.
मात्र आपल्या देशातील सेना व रक्षा विभाग उभे होणारे संकट हाणून पाडेल असे देखील सांगितले गेले आहे. मित्रांनो भेंडवळ गाव पूर्णा नदीच्या काठी आहे.
मित्रांनो याच भेंडवळ गावातून भविष्यवाणी सांगण्याची रूढी आहे. या भविष्यवाणीचा इतिहास असा की, चंद्रभान महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी घटमांडणीची सुरुवात केली होती अर्थात या राजाने तीनशे वर्षांपूर्वी पहिल्यांदा घट मांडणी करून भविष्यवाणी सांगितली होती.
अर्थात या घटमांडणीला 300 वर्षांची परंपरा आहे. निश्चितच महाराष्ट्रातील संस्कृतीचा जागर यामधून केला जात आहे. तीनशे वर्षांपासून ही परंपरा आजही अखंडित सुरू आहे.
तीन मे रोजी घटमांडणी करून 4 मे रोजी पहाटे भाकित वर्तवले. सध्या चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे भाकीत जाहीर करतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी गावाशेजारील एका शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. या घटामध्ये गहू, ज्वारी, तुर, उडीद,मूग, हरभरा यासह इतर आठ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, सांजोरी, कुरडई इत्यादी खाद्यपदार्थ ठेवले जातात.
म्हणजे आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्या पद्धतीने घागर पूजन केले जाते अगदी त्याच पद्धतीने या भेंडवळच्या भविष्यवाणीत देखील केले जाते आणि अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता या पदार्थांमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून भविष्यवाणी महाराजांच्या वंशजांद्वारे वर्तवली जाते.