नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या सुनावणीस हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. जालना येथे ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्यनिर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले.
परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे निर्मात्याला देण्यात आले नाहीत. नाटकांचे प्रयोग आयोजित करून नाट्यनिर्मात्याचे पैसे बुडविल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत याबाबत घोरपडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने जरांगे यांना दोनदा समन्स बजाविले होते. मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते.
अखेर अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आल्यानंतर जरांगे मेअखेरीस न्यायालयात हजर झाले होते. तेव्हा न्यायालयाने जरांगे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर हे वॉरंट रद्द केले होते. परंतु, त्यानंतरही जरांगे सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वारंट काढले आहे.
उपोषणही स्थगित
मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीतील 5 दिवसांपासून उपोषण सुरु होते. आता हे उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीये.
जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा
आणि उपचार घेण्याचा, सलाईन लावण्याचा जोर धरला असून त्यामुळेच त्यांनी हे उपोषणमागे घेण्याचा निर्णय घेतलाय. ते म्हणाले, उपचार न घेता व सलाईन न घेता मी मरेपर्यंत उपोषण करेल पण सलाईन लावून मी उपोषण करणार नसल्याचे ते म्हणाले.