केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षणाची संधी, जाणून घ्या अटी व निवड प्रक्रिया!

केंद्रीय विद्यालयांमध्ये आता मोफत शिक्षणाची संधी मिळणार असून आरक्षण व विशेष गटांसाठी प्रवेशप्रक्रियेत खास सवलती व अटी लागू करण्यात आल्या आहेत. या नवीन अटी आणि प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर जाणून घेऊयात-

Published on -

KV Schools | केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) देशातील नामांकित सरकारी शाळांपैकी एक असून देशात सध्या 1,256 केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सुमारे 13,53,129 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 56,810 कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि शिस्तबद्ध व्यवस्था यामुळे या शाळांची लोकप्रियता प्रचंड आहे. दरवर्षी हजारो पालक आपल्या पाल्याला येथे प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करतात.

‘या’ विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट-

केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ही पारदर्शक आणि टप्प्याटप्प्याने होणारी असून, यामध्ये विविध प्राधान्यक्रम ठेवले गेले आहेत. विशेष बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते. या मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत.

केंद्रीय विद्यालयांमध्ये पहिली ते आठवी इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. इयत्ता 9वी आणि 10वीसाठी मुलांना दरमहा 200 रुपये, 11वी आणि 12वीतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना 400 रुपये आणि इतर शाखांसाठी 300 रुपये फी आकारली जाते. त्याशिवाय, सर्व विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये शाळा विकास निधी आणि 100 रुपये संगणक शिक्षणासाठी फी आकारली जाते.

तथापि, एकल मुली , अनुसूचित जाती/जमाती, आरटीई अंतर्गत येणारे विद्यार्थी, KVS कर्मचाऱ्यांची मुले यांना शिक्षण फीपासून सूट मिळते. यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक अडथळ्यांशिवाय प्रगती करता येते.

निवड प्रक्रिया-

प्रवेशासाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातात. पहिलीसाठी लॉटरी सिस्टीमद्वारे प्रवेश दिला जातो, तर इतर वर्गांसाठी प्राधान्य आणि गुणवत्तेनुसार निवड केली जाते. 9वीसाठी लेखी परीक्षा घेतली जाते. 11वीत प्रवेश 10वीच्या निकालावर आधारित असतो.

या शाळांमध्ये केंद्र सरकारचे हस्तांतरणीय कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, स्वायत्त संस्थांचे कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, आणि शेवटी खाजगी क्षेत्रातील मुलांना रिक्त जागांवर प्रवेश दिला जातो. याशिवाय, आरक्षण प्रवर्गातील मुले – अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, अपंग आणि एकल मुलींना खास प्राधान्य दिले जाते.

केंद्रीय विद्यालय ही केवळ शिक्षण संस्था नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मजबूत पाया घालणारी यंत्रणा आहे. जर पालकांनी सर्व अटी आणि कागदपत्रांची पूर्तता केली तर मुलांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe