पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता ‘रिंग रोड’ प्रकल्पाला अधिक गतिमान करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कनेक्टिव्हिटीसाठी १५ इंटरचेंज विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी १४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
महत्त्वाचा निर्णय
‘पीएमआरडीए’च्या भौगोलिक क्षेत्रफळात ६,२४६.२६ चौरस किलोमीटर एवढा मोठा परिसर समाविष्ट आहे. यात ९ तालुके आणि ६९७ गावे येतात. या क्षेत्रातील दळणवळण अधिक प्रभावी करण्यासाठी पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदी केल्या आहेत. नियोजित ‘रिंग रोड’ आणि पुणे-सातारा व पुणे-नगर रस्त्यांपासून प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘रिंग रोड’साठी १५ इंटरचेंज
रिंग रोडशी जोडणारे १५ इंटरचेंज प्रस्तावित असून, त्यातील १२ आधीच अस्तित्वात आहेत, तर ३ नव्याने विकसित करण्यात येणार आहेत. या इंटरचेंजमुळे चांदखेड ते कासारसाई, मुठा टॉप ते उरावडे आणि निघोजे ते मोई या भागांतील वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच, १२.१० किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते रिंग रोडशी जोडण्यात येणार आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
ह्या ९ तालुक्यांना फायदा
प्रस्तावित रिंग रोड मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा आणि मुळशी या ९ तालुक्यांमधून जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी इंटरचेंज आणि नवीन रस्त्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील २,५५० चौरस किलोमीटर परिसरासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी तब्बल १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यात पुरंदर विमानतळाशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका, पीएमपी बससेवेचे नवीन मार्ग, टर्मिनल्स आणि रेल्वे जोड मार्गिका विकसित करण्यात येणार आहेत.
वाहतूक सुधारण्यासाठी मोठा टप्पा
पीएमआरडीएने ‘रिंग रोड’ आणि त्याला जोडणाऱ्या इंटरचेंजसाठी १४५ कोटींच्या तरतुदीसह मंजुरी घेतली आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.
‘रिंग रोड’मुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले की, ‘रिंग रोड’ हा पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. इंटरचेंजच्या माध्यमातून प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. पुणे-सातारा आणि पुणे-नगर रस्त्यांना जोडणाऱ्या योजनेचा सुद्धा यात समावेश आहे. त्यामुळे शहराचा वाहतूक भार कमी होऊन सर्व भागांना अधिक चांगली दळणवळण सुविधा मिळणार आहे.’