पदवीप्रदान समारंभासाठी इंग्रजानी सुरू केलेल्या झगा आणि हॅट घालण्याची पध्दत बंद करणे गरजेचे – माजी राज्यपाल राम नाईक

Published on -

खेड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण बाळासाहेब विखे पाटील यांना होती. प्रवरेतील आरोग्याचे ज्ञानपीठ हे त्यांच्या ज्ञान आणि क्रियाशिलता या गुणांचा सुरेख संगम आहे. ग्रामीण विषयातील त्यांचे ज्ञान कमालीचे असल्याने ते सतत खटपट करीत असायचे.

यातूनच त्यांच्या सहकार्याने आपण ऊसाच्या मळीपासून इथेनॉल निर्माण करून ऊस उत्पादक आणि साखर उद्योगाचे प्रश्न सोडवीण्यासाठी पेट्रोलियम मंत्री असताना देशात तीन पायलट प्रकल्प सुरू केले होते असे प्रतिपादन माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या 16 व्या पदविप्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी कुलपती डॉ. विजय केळकर, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, मोनिका सावंत, कल्याणराव आहेर, एम.एम.पुलाटे, कुलसचिव अरूणकुमार व्यास, परिक्षा नियंत्रक बाळासाहेब नाईक उपस्थित होते.यावेळी डॉ. विजय केळकर यांना डिलीट ही पदवी देऊन विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले.

यावेळी बोलतांना नाईक म्हणाले की, गुरूमुळे पदवी प्राप्त झाली आहे याचे स्मरण ठेवून डॉक्टरांनी जीवनात काम केले पाहीजे. रूग्णांची सेवा हाच आपला धर्म मानला पाहीजे.

पदवीप्रदान समारंभासाठी इंग्रजानी सुरू केलेल्या झगा आणि हॅट घालण्याची पध्दत बंद करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या कामाचे अवलोकन करून विषयाच्या अनुषंगाने सर्व विद्यापीठांनी भारतीय पोषाखाचा स्विकार करण्याचे आवाहन ही यावेळी बोलतांना नाईक यांनी केले.

यावेळी बोलतांना डॉ. केळकर यांनी , गेल्या पाच दशकापासून प्रवरा मेडीकल ट्रस्टचे कार्य सुरू आहे. अतिशय दुर्गम भागात देखील आरोग्यसेवा देत असून आदीवासी भागातील खेड्यातील वाडे, पाडे अशा डोंगराळ भागात देखील आरोग्यसेवा देत आहे.

आदीवासींसाठी गेल्या वीस वर्षापासून आरोग्य सेवा, विविध सोयी सुविधा उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली असून प्रवरेचे आदिवासी आरोग्य केंद्र हे देशातील एक आदर्श मॉडेल असल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी आपण आज समाजात डॉक्टर म्हणून काम करणार आहात. आपण येथे आला तॊ दिवस आणि आजचा दिवस यात मोठे अंतर आहे. आपण महाविद्यालय नाव मोठे कराल तसेच समाज्यातील गरजूची सेवा होईल अशी अपॆक्षा पुढे बोलतांना डॉ विखे यांनी व्यक्त केली.

यावेळी सर्व पदवी व पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके व पदवी प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. १० पीएच.डी., ९ सुवर्णपदके आणि ६५१ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ अरुण कुमार व्यास यांनी मानले. डॉ दीपिका भालेराव यांनी सूत्रसंचालन केले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News