पंतप्रधान मोदींसाठी म्हणून माघार : राणा दाम्पत्याची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांन अखेर रद्द केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२४ एप्रिल) मुंबईत येणार आहेत, त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी माघार घेत असल्याची घोषणा राणा यांनी केली.

कालपासून राणा आणि शिवसैनिकांत या विषयावरून घमासान सुरू आहे. शिवसैनिका आणि पोलिसांमुळे राणा यांना घराबाहेरही पडता आले नाही.

शेवटी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला येत आहेत.

मोदींच्या या दौऱ्याला गालबोट लागू नये किंवा हा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असे राणा यांनी जाहीर केले. आता ते अमरावतीला परत जाणार आहेत. पोलिस बंदोबस्तात त्यांना अमरावतीला पाठविले जाऊ शकते.