Business Success Story : कोणत्याही क्षेत्रात जर यशाला गवसणी घालायची असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागते. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. मात्र हे काम प्रत्येकच व्यक्तीला जमत नाही. जे लोक अडचणींवर मात करतात तेच खरे यशस्वी होतात. आपल्यापुढे असे अनेक यशस्वी लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी अडचणींवर मात करत यशाच गिरीशिखर गाठलं आहे.
सोयी-सुविधांचा अभाव असतो, आर्थिक परिस्थिती बेताची असते मात्र तरीही आपल्या उत्तुंग इच्छाशक्तीच्या जोरावर काही लोक यशस्वी होतात. दरम्यान आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने एकेकाळी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी गल्लोगल्ली फिरत भीक मागून उदरनिर्वाह केला होता. मात्र आजच्या घडीला हा अवलिया करोडो रुपयांचा मालक आहे.

आम्ही ज्या अवलियाबाबत बोलत आहोत ते आहेत रेणुका आराध्या. रेणुका आराध्या आज 40 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. मात्र त्यांचा हा यशाचा प्रवास पाहिजे तेवढा सोपा नव्हता. सुरुवातीच्या संघर्षाचा काळात त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागला. रिपोर्टनुसार आराध्या यांची घरची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्यांचे वडील पुजारी होते. घरची परिस्थिती ही खूपच गरिबीची होती.
घरात खाण्यासाठीच पैसा नव्हता यामुळे त्यांना शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की ते त्यांच्या वडिलांसमवेत गल्लोगल्ली फिरून लोकांकडून पीठ तांदूळ मागून आणत आणि मग पोटाची भूक शांत होत असे.
दरम्यान या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीपर्यंतचे शिक्षण देखील खूपच मेहनतीने पूर्ण करावे लागले. यानंतर घरची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना पुढे शिकता आले नाही.
मग काय कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी त्यांनी जे काम मिळेल ते काम करण्याला सुरुवात केली. त्यांनी लोकांच्या घरी घरकाम देखील केले. यानंतर त्यांनी सेक्युरिटी गार्डची नोकरी केली. पण त्यांनी आपण गरिबीत जन्माला आलो आहोत मात्र गरीबीत मरायचे नाही असे ठरवले होते.
यामुळे त्यांनी ड्रायव्हिंग शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गाडी चालवणे शिकून घेतले. यानंतर मग त्यांनी एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली.जवळपास चार वर्ष त्यांनी ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम करताना त्यांना या व्यवसायाबाबत बऱ्यापैकी ज्ञान मिळाले.
शिवाय स्वतः ड्रायव्हर असल्याने त्यांना ड्रायव्हिंग मधील बारकावे देखील माहित होते. यामुळे त्यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडली आणि स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी एक कार खरेदी केली आणि हा व्यवसाय सुरू केला.
ड्रायव्हिंग फिल्ड मधून संपूर्ण नॉलेज मिळवल्यानंतर त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली असल्याने तो व्यवसाय अपयशी होणे शक्य नव्हते. झालं देखील तसंच, त्यांचा व्यवसाय चांगला जम धरू लागला. व्यवसायाने कमी दिवसातच चांगली प्रगती केली. आज त्यांचा हा ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय 40 कोटींपर्यंत पोहोचला आहे. ते चाळीस कोटीच्या कंपनीचे मालक आहेत. आज त्यांच्या कंपनीत शेकडो वर्कर कामाला आहेत.