Ahilyanagar News : महाविकास आघाडी अहिल्यानगर जिल्ह्यात जागा वाटपात महायुतीच्या पुढे आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बारा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भिडू मैदानात उतरले आहेत. मात्र महायुती कडून आतापर्यंत फक्त दहा जागांवर निर्णय झालेला आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ या दोन मतदार संघात अजून महायुतीचे उमेदवार ठरलेले नाहीत.
यामुळे या दोन जागांवर कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खरे तर श्रीरामपूर मतदार संघातही अजून महायुतीचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे या जागेवर आयात उमेदवाराला संधी मिळाली आहे. येथील विद्यमान आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसला राजीनामा ठोकत अजितदादा यांच्या गटात प्रवेश घेतला असून कानडे यांना आता अजितदादा गटाकडून तिकीट मिळणार असे दिसते.
खरे तर श्रीरामपूरची ही जागा शिंदे यांच्या वाट्याला येणार असे म्हटले जात होते. या जागेवरून भाजपचे नितीन दिनकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या. आमदार लहू कानडे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील शिवसेनेकडे फिल्डिंग लावली होती.
श्रीरामपूर ची जागा आरपीआयला मिळावी यासाठी रामदास आठवले देखील आग्रही होते. मात्र ऐनवेळी महायुतीने येथे भाकरी फिरवली आहे. ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली असून येथून विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आता फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नेवासा या दोन मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान संगमनेर बाबत बोलायचं झालं तर येथून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळू शकते असे बोलले जात आहे.
नेवासा मतदारसंघासाठी भाजपकडील इच्छुक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची नावं पाठवण्यात आली आहे. या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे हे पण इच्छुक आहेत.
त्यामुळे इथून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्यासारखे ठरेल. खरे तर अहिल्या नगर जिल्ह्यात अजून शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नाही. यामुळे नेवाशाची जागा शिंदे गटाला मिळणार का हे पाहण्यासारखे राहील.
महायुतीचे उमेदवार खालीलप्रमाणे
भाजप राधाकृष्ण विखे (शिर्डी)
भाजप माजी आमदार शिवाजी कर्डिले (राहुरी)
भाजप आमदार मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी)
भाजप प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा)
भाजप आमदार प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड)
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर)
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार किरण लहामटे (अकोले)
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार लहू कानडे (श्रीरामपूर)
राष्ट्रवादी काँग्रेस काशिनाथ दाते (पारनेर)