Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने राहणार आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे यंदाच्या निवडणुका विशेष लक्षवेधी राहतील. यंदा पहिल्यांदाच काँग्रेस भारतीय जनता पक्ष अजित पवार गट शरद पवार गट शिंदे गट आणि ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पहिल्यांदाच हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याने या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.
या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. खरंतर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघात यंदा काटेदार लढती होण्याची अपेक्षा आहे.
मात्र यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये फारच चूरशीची लढत होणार आहे. खरे तर महायुतीने आणि महाविकास आघाडीने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बारावी विधानसभा मतदारसंघात आपले अधिकृत उमेदवार उतरवले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. मात्र या दोन्ही गटातील बंडोबांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या बंडोबांना कसे रोखणार हे पाहण्यासारखें ठरणार आहे.
तसेच महायुती मधील आणि महाविकास आघाडी मधील बंडोबा निवडणुकीतुन माघार घेणार की निवडणूक लढवणार या सर्व गोष्टी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या तारखे नंतरच म्हणजेचं चार नोव्हेंबरनंतर क्लिअर होणार आहेत.
तत्पूर्वी आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील लढती थोडक्यात जाणून घेणार आहोत. जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार राहतील हे आता आपण पाहणार आहोत.
1) अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघ : या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप तसेच महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात लढत होणार आहे.
2)श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : या जागेवर महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच महाविकास आघाडी कडून या जागेवर ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
3) शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ : या जागेवर महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) प्रतापरावं ढाकणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4) राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघ : भाजपकडून जिल्हा बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
5) शिर्डी विधानसभा मतदारसंघ : महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाच्या प्रभावती घोगरे यांच्यात लढत होणार आहे.
6) कोपरगाव विधानसभा मतदारसंघ : महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
7) पारनेर : महाविकास आघाडी कडून पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना शरद पवार गटाकडून आणि महायुतीकडून या जागेवर अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
8)कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ : महायुतीकडून या जागेवर भारतीय जनता पक्षाने विधान परिषद आमदार राम शिंदे यांना तिकीट दिले आहे तर महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांना या जागेवर पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
9)अकोले विधानसभा मतदारसंघ : या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे व महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे युवा नेते अमित भांगरे यांच्यात लढत निश्चित झाली आहे.
10)संगमनेर विधानसभा मतदार संघ : महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व महायुतीकडून शिंदे गटाचे अमोल खताळ यांना उमेदवारी दिली आहे.
11) श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ : महाविकासआघाडीकडून काँग्रेसचे हेमंत ओगले आणि महायुतीच्या शिंदे सेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे या नेत्यांमध्ये लढत होणार आहे.
12) नेवासा विधानसभा मतदारसंघ : महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अन माजीमंत्री शंकरराव गडाख आणि महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहार पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे.
बंडोबाचा तोरा कसा रोखणार
पहिल्या नगर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन्ही गटात अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचे प्रमाण फारच अधिक आहे. श्रीरामपूरला उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे माजी आमदार लहू कानडे यांनी राष्ट्रवादीकडून, श्रीगोंद्याला माजी आमदार राहुल जगताप, सुवर्णा पाचपुते, घनशाम शेलार, अण्णा शेलार, शेवगाव-पाथर्डीत माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, भाजप नेते गोकुळ दौंड,
अकोल्यात माजी आमदार वैभव पिचड, पारनरेला शिवसेना (उबाठा गट) नेते संदेश कार्ले, अहिल्यानगर शहरातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर अशी वजनदार मंडळी उमेदवारी मिळाली नसल्याने अपक्ष लढण्याची भाषा करत अर्ज दाखल केले आहेत. यामुळे यातील किती बंडखोर हे उमेदवारी अर्ज माघे घेणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.