Ahilyanagar News : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. इतर पक्षांनी मात्र जिल्ह्यातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जागा वाटपावरून अजून एकमत झालेले नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील नगर शहर, श्रीगोंदा आणि पारनेरच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा पाहायला मिळतोय. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने दावा सांगितला आहे.

मात्र दक्षिणेतील नगर शहर, पारनेर आणि श्रीगोंदा या तीन जागांवर महाविकास आघाडीतील शिवसेना अर्थातच ठाकरे गट इच्छुक असून यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या तीन जागांवर महाविकास आघाडीत कोणता निर्णय होणार, कोणती जागा कोणत्या पक्षाला जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व स्थापित केले होते. जिल्ह्यात सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जिल्ह्यातील समीकरण चेंज झाले आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार गटात आणि काही आमदार अजित पवार गटात समाविष्ट झाले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले असले तरी देखील शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेमध्ये मोठा उलट फेर करून दाखवलाय.
त्यामुळे दक्षिणेत शरद पवार गटाची ताकद अधिक असल्याचे स्पष्ट झाले. हेच कारण आहे की, शरद पवार गट दक्षिणेतील सर्वच्या सर्व अर्थातच नगर शहर, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर आपला भिडू उतरवण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.
मात्र यामुळे ठाकरे गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. नगर शहर, पारनेर आणि श्रीगोंदा या तीन जागांसाठी ठाकरे गट लोकसभा निवडणुकीपासून आग्रही असताना देखील शरद पवार गटाने या जागांवर दावा ठोकला असल्याने ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे आता या तीन जागांवर नेमका कोणाचा भिडू निवडणुकीच्या मैदानात दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मिळालेल्या माहितीनुसार लवकरच शरद पवार गटाची उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांचा देखील समावेश राहणार आहे. त्यामुळे जेव्हा शरद पवार गटाची अधिकृत उमेदवारांची यादी समोर येईल तेव्हाच अहिल्यानगर जिल्ह्यातील या तीन विधानसभा मतदारसंघाचे चित्र क्लिअर होणार आहे.