अहिल्यानगरमधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच मनपामध्ये भरतीप्रक्रिया सुरु होईल असे चित्र आहे. त्याच कारण असं की या भरती संदर्भात आ.संग्राम जगतापांनी थेट अधिवेशनात विधिमंडळात मागणी केली आहे.
अधिक माहिती अशी : विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ. जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये तातडीने टेक्निकल स्टाफची भरतीकरून अग्निशमन विभागाचेही आधुनिकीकरण करण्याची मागणी केली. शासनाने अहिल्यानगरच्या प्रलंबित समस्यांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे म हानगरपालिका ते महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यासाठी शासनाने नवीन नियम करावा. त्यामुळे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची हुकुमशाही न चालता जनतेचा हुकुम चालला पाहिजे, अशीही मागणी आ. जगताप यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर आता शहर चहूबाजूंनी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चांगल्या सुविधांसाठी व नव्या कामांसाठी महानगरपालिकेत टेक्नीकल स्टाफ असणे आवश्यक झाले आहे.
त्यामुळे शासनाने नव्या अधिकाऱ्यांच्या भरतीस परवानगी द्यावी. अहिल्यानगर महानगरपालिकेत आता बोटावर मोजण्या इतके अभियंते कार्यरत आहेत. इलेक्ट्रिक विभागाचे तर २०१८ पासून अभियंतापद रिक्त आहे. त्यामुळे तातडीने नव्या टेक्निकल स्टाफच्या भरतीस शासनाने मंजुरी द्यावी.
अहिल्यानगर शहरात आता बहुमजली इमारती उभ्या रहात आहेत. मात्र महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे बहुमजली इमारतीची आग विझविण्यासाठी यंत्रणा नाहीये. त्यात अहिल्यानगर अग्निशमन विभागाचेही बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.
जर एखादी आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली तर महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे म्हटले आहे. त्यामुळे आता मनपातील भरती लवकरच होईल अशी आशा तरुणांत निर्माण झाली आहे.