Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपले अधिकृत उमेदवार आता जवळपास अंतिम केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आपले अधिकृत उमेदवारांची नावे हळूहळू जाहीर करत आहेत. आतापर्यंत अनेक उमेदवारांची नावे सार्वजनिक झाली आहेत.
ज्या जागांवर दोन्ही गटांमध्ये सस्पेन्स आहे त्या जागांवरही लवकरच निर्णय होईल आणि नावांची घोषणा होणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेने आज, सोमवारी रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिंदे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये शिवसेनेने ४५ जणांना उमेदवारी दिली होती.

दुसऱ्या यादीमध्ये २० जणांची नावं होती. तसेच, आता तिसऱ्या यादीमध्ये १५ जणांचा समावेश आहे. या तिसऱ्या यादीत शिंदे गटाने संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा केली आहे.
तसेच यातील दोन जागा आपल्या सहयोगी पक्षांना दिल्या आहेत. जनसुराज्य पक्ष आणि राजश्री शाहू विकास आघाडी या दोन पक्षांना अनुक्रमे हातकणंगले आणि शिरोळ या दोन विधानसभा मतदारसंघाच्या जागा देण्यात आल्या आहेत.
पण, या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील 3 उमेदवारांच्या घोषणा झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण की श्रीरामपूरच्या जागेवर अजित पवार गटाने आधीच उमेदवार उतरवलेला आहे. दुसरीकडे संगमनेर मधून भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
अशा परिस्थितीत या दोन जागांवर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार की बंडाची ठिणगी पडणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान आता आपण शिंदे गटाने जाहीर केलेले पंधरा उमेदवार कोणते हे पाहणार आहोत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील या तीन जागांवर शिंदे गटाची मोठी खेळी !
शिंदे गटाने आज जाहीर केलेल्या आपल्या तिसऱ्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवारांचा समावेश आहे. शिंदे गटाने अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत एकही उमेदवार उतरवलेला नव्हता.
आता मात्र पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अमोल खताळ, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे अन नेवासा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठलराव लंघे पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.
शिंदे गटाने जाहीर केलेले 15 उमेदवार
संगमनेर – अमोल खताळ
श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे
नेवासा- विठ्ठलराव लंघे पाटील
सिंदखेडराजा – शशिकांत खेडेकर
घनसावंगी- हिकमत उढाण,
कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी
धाराशिव- अजित पिंगळे
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राऊत
गुहागर- राजेश बेंडल
हातकणंगले- अशोकराव माने (जनसुराज्य पक्ष)
शिरोळ- राजेंद्र पाटील येड्रावकर (राजश्री शाहूविकास आघाडी)