Ahilyanagar News : ऐन विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांनी पक्षासोबत बंडखोरी केली त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.
विधानसभा निवडणुका सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने बंडोबांना हिसका दाखवलाय. यामुळे पुन्हा एकदा बीजेपीच्या धक्का तंत्राची प्रचिती आली आहे.

भारतीय जनता पक्षाने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 40 बंडोबांना बाहेरचा रस्ता दाखवत शिस्तभंग केल्यास काय होऊ शकते? याचे एक उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही भाजपाने धक्का तंत्राचा अवलंब करत दोन बड्या नेत्यांची हकालपट्टी केली आहे. यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात भाजपाच्या या धक्कातंत्राची चर्चा सुरू आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सुवर्णा पाचपुते यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या बंडोबांविरोधात कारवाई केली असल्याने महायुती मधील अजित पवार गट आणि शिंदे गट असेच कारवाई करणार का हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भाजपच्या लंघे यांना शिंदे सेनेचे तिकीट मिळाल्याने मुरकुटे अस्वस्थ
नेवासा विधानसभा मतदार संघाची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला गेली. यामुळे निवडणूक लढवण्याची लालसा असणारे माजी आमदार मुरकुटे नाराज झालेत. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी केली.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाने मुरकुटे यांना माघार घ्यायला सांगितले होते. मात्र मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भाजपकडे असलेली ही नेवासा विधानसभेची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाकडे गेलीये. पण येथून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार शिंदे सेनेच्या चिन्हावर उभा राहिला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. यामुळेचं अस्वस्थ झालेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी पक्षाचा आदेश बाजूला सारत बंडखोरी कायम ठेवल्याची चर्चा सध्या मतदार संघात रंगली आहे.
सुवर्णा पाचपुते यांना बंडखोरीचा प्रसाद
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली. नंतर प्रतिभा पाचपुते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांचे सुपुत्र विक्रम पाचपुते यांच्या हातात कमळ देत त्यांना श्रीगोंद्याचे उमेदवार बनवले गेले.
पण, श्रीगोंद्यातून सुवर्णा पाचपुते हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील केला होता. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा पाचपुते कुटुंबावरच विश्वास दाखवला. यामुळे सुवर्णा पाचपुते यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
पक्षाने सुवर्णा पाचपुते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र पाचपुते हे उमेदवारीवर ठाम राहिलेत. यामुळे त्यांना पक्षाकडून प्रसाद मिळाला असून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.