Ahilyanagar News : निवडणुक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. अहिल्या नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असणारा काळे विरुद्ध कोल्हे हा राजकीय संघर्ष या निवडणुकीत तरी टळणार असे दिसते.

गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून स्नेहलता कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आशुतोष दादा काळे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत काळे यांनी विजयी पताका फडकवली. मात्र गेल्यावेळची लढत ही खूपच काटेदार झाली होती यात शंकाच नाही. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि दोन गट तयार झालेत.
शरद पवार गट आणि अजित पवार गट हे आता अनुक्रमे महाविकास आघाडी आणि महायुतीचा भाग आहेत. सध्या कोपरगाव चे आमदार हे अजित पवार यांच्या गटात असून महायुतीचा एक भाग आहेत. दरम्यान कोपरगावची ही जागा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला सुटली असून येथून पुन्हा एकदा आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पण, यामुळे भाजपा मध्ये असणाऱ्या कोल्हे कुटुंबाची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. महायुतीकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही याची शाश्वती कोल्हे यांनाही होती यामुळे त्यांनी दुसरा पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र बंडखोरी करतील तोवर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत कोल्हे यांची मनधरणी केली.
यानुसार आता कोल्हे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच गेल्या तीन पिढ्यांचा राजकीय संघर्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार नाही हे जवळपास फिक्स झाले आहे. दरम्यान या निर्णयाचा थेट फायदा कोपरगाव चे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना होणार आहे.
यासोबतच शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे. खरे तर गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने विखे यांची सत्ता उलथून लावली. यामुळे जर विवेक कोल्हे यांनी भाजपा सोडली असते तर विखे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असणाऱ्या प्रभावती घोगरे यांना कोल्हे रसद पुरवण्याची शक्यता होती.
महत्त्वाची बाब म्हणजे गणेश सहकारी साखर कारखान्यात बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने विखे यांच्या बलाढ्य यंत्रणेला कात्रज चा घाट दाखवणाऱ्या कोल्हे यांना यावेळी बाळासाहेब थोरात देखील गळाला लावू शकले नाहीत. ही भारतीय जनता पक्षासाठी नक्कीच एक मोठी बाब आहे.
दरम्यान गणेश नगर पट्ट्यात कोल्हे यांना आता पक्षाची भूमिका घ्यावी लागणार आहे म्हणजेच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी काम करावे लागणार आहे. याचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या महायुतीच्या अनेक नेत्यांना फायदा होणार आहे. काळे, विखे यांचे मनोबल यामुळे वाढणार आहे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे मनोबल यामुळे नक्कीच कमी होणार आहे.
सध्याची परिस्थिती पाहता काळे यांच्यासमोर कोणीच तुल्यबळ उमेदवार दिसत नसल्याने यावेळी कोपरगावची निवडणूक एकतर्फी होईल असे मत राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तथापि या निवडणुकीत कोल्हे यांच्या या निर्णयाचा कोणाकोणाला आणि कसा फायदा होणार ? हे येणारा काळच सांगणार आहे.