Ahilyanagar Politics : सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष कोण होतील? कसे होतील? आदींकडे जिल्ह्यातील जनतेपेक्षा भाजपमधीलच नेत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. याचे कारणही तसेच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची उमेदवारी देणाऱ्या एबी फॉर्मचे वितरण जिल्हाध्यक्षांद्वारे होणार आहे.

त्यामुळे यावेळी आपल्या समर्थकांना संधी देण्याचा अधिकार आपल्यालाच असावा, या हेतूने जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न आता जिल्ह्यातील भाजप आमदारांचा सुरु असल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, ज्येष्ठ नेते व आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते व तीनवेळा आमदार झालेल्या मोनिकाताई राजळे या नेत्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी आपल्याच समर्थकाला बसवण्याची रस्सीखेच असल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडीत कोणता नेता बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे. दरम्यान, नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी सहा, दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी चार व उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदासाठी तीनजण इच्छुक असल्याची चर्चा आहे.
मंत्री जयकुमार रावल यांची जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असल्याने ते जिल्ह्यात कधी येतात व इच्छुकांच्या मुलाखती घेतात, याची प्रतीक्षा भाजप समर्थकांना आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची उमेदवारी देणाऱ्या एबी फॉर्मचे वितरण जिल्हाध्यक्षांद्वारे होणार आहे.
त्यामुळे यावेळी आपल्या समर्थकांना संधी देण्याचा अधिकार आपल्यालाच असावा, या हेतूने जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न अनेकांचा सुरू आहे. यासाठी नेत्यांकडे पाठपुरावाही सुरू आहे. यात कोण बाजी मारते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
नेत्यांकडूनही निवडणुकीतील तिकीट वाटप आपल्याच समर्थकाच्या हातून व्हावे यासाठी आपला निष्ठावंत जिल्हाध्यक्षपदावर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील मंडलाध्यक्षांच्या निवडी आज वा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यावरही नेत्यांच्या मर्जीची छाया असणार आहे.
ही मंडळी आहे शर्यतीत …
नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान सरचिटणीस सचिन पारखी, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, धनंजय जाधव, वसंतशेठ लोढा, मिलिंद गंधे व प्रा. भानुदास बेरड, असे सहाजण इच्छुक असल्याचे समजते. यातील मिलिंद गंधे व वसंतशेठ लोढा यांनी याआधी शहराध्यक्षपद तर प्रा. बेरड यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे.
मात्र, या तिघांनी नगर शहर जिल्हाध्यक्षपद भूषवलेले नाही. तर पारखी, सानप व जाधव यांनी शहर कार्यकारिणीत विविध पदे भूषवली आहेत. नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपद शर्यतीत राहुल कारखिले, युवराज पोटे, डॉ. मृत्यूंजय गर्जे व विश्वनाथ कोरडे असे चौघे शर्यतीत आहेत.
विद्यमान दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचे नाव चर्चेत नसले तरी आ. शिवाजीराव कर्डिलेंची विशेष मर्जी त्यांच्यावर असल्याने त्यांनाही पुन्हा संधी मिळण्याची आशा आहे. तर उत्तर जिल्हाध्यक्षपद शर्यतीत विद्यमान जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जालिंदर वाकचौरे व सचिन तांबे असे तिघे आहेत.