थोरात – विखे यांचे राजकीय वैर आता पुढच्या पिढीकडे ! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात खडाजंगी

या विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी सलग आठ टर्म म्हणजेच 40 वर्ष आमदारकी भूषवली आहे. थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे भूषण आहेत. महत्त्वाचे म्हणजे याही निवडणुकीत थोरात हेच उमेदवारी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला ठाऊक आहे. पिढ्यानपिढ्या या दोन्ही मोठ्या राजकीय कुटुंबांमध्ये राजकीय वैर पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता हे राजकीय वैर पुढच्या पिढीकडे ही स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे. खरे तर काल विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच इच्छुकांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तयारीला गती देण्यात आली आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची नावे फायनल झालेली नाहीत. मात्र इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून फार आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यातूनच आता राजकीय संघर्ष देखील तीव्र होऊ लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र आहे. संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हटलं की संगमनेर हे या विधानसभा मतदारसंघाचे गणित आहे.

या विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी सलग आठ टर्म म्हणजेच 40 वर्ष आमदारकी भूषवली आहे. थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे भूषण आहेत. महत्त्वाचे म्हणजे याही निवडणुकीत थोरात हेच उमेदवारी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

दुसरीकडे थोरात यांना यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे आव्हान देताना दिसतील अशा चर्चा आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधून निवडणूक लढवू असा निर्धार केला आहे.

यासाठी त्यांची चाचपणी सुरू असून याच पार्श्वभूमीवर विखे पिता पुत्र यांचे संगमनेरातील दौरे वाढले आहेत. यामुळे मात्र थोरात कुटुंब देखील अलर्ट मोडवर आले आहे. यावेळी संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर मतदार संघातील सर्व प्रकारचे राजकीय निर्णय जयश्रीताई स्वतः घेत असल्याचे दिसून येते. दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीवर जयश्रीताई थोरात यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. जयश्री ताई यांनी सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत बोलतांना, ‘मोठं आव्हान काही नाही. लोकशाहीची प्रक्रिया आहे.

त्यांनी संगमनेरमधून खुशाल लढावं. त्यांचे स्वागत करू. पण ही थोरातसाहेबांची माणसं आहेत. थोरातसाहेबांचा परिवार आहे. खूप कष्टानं संगमनेर परिवार मोठा झालेला आहे. म्हणून विखेंना येथून नाराज होऊनच जावे लागणार, अशी माझी खात्री आहे,’ अशा शब्दात सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. जयश्री ताई यांच्या या विधानानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सुजय विखे पाटील काय म्हणतात ?

जयश्री थोरात यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे यांनी ‘मंत्री विखे साहेबांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. त्यांना मंत्रालय, कॅबिनेट बैठकांना जावे लागते. विखेसाहेब जेव्हा परत येतील, तेव्हा मी इतर भागात फिरायला सुरवात करेल.

पण, इथे मी तुल्यबळ उमेदवार नसेल, खरचं जर मला संगमनेरमध्ये हरवणे सोपं असेल, तर मग थोरातांचा सर्व परिवार फिल्डवर का आहे ? एवढी चांगली परिस्थिती असेल तर एवढ्या लोकांनी फिल्डवर फिरण्याची आवश्यकता नाही,’ अशा शब्दात सुजय विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. यानिमित्ताने मात्र बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील हा राजकीय संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढीकडे आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe