Ahilyanagar Politics : राहाता तालुक्यातील डोहाळे गावात नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी दाखल झाले. तब्बल चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर हे पाणी गावात पोहोचल्यामुळे संपूर्ण परिसरात जलोत्सवाचे वातावरण होते. या ऐतिहासिक प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जलपूजन सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावकऱ्यांनी जलाचा उत्सव साजरा करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पाणी राजकारणाच्या केंद्रस्थानी
यावेळी बोलताना डॉ. विखे यांनी जलसंपदा खाते मिळाल्याचा उल्लेख करत भावनिक भाष्य केले. वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना हे खाते मिळावे, यासाठी आपण साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली होती, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की आज त्या खात्याच्या माध्यमातून मतदारसंघातील गावागावात पाणी पोहोचले आहे.

१० किलोमीटरचे काम एक महिन्यात
निळवंडे कालव्याचे काम रखडल्याचे सांगत डॉ. विखे यांनी या प्रकल्पात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा आढावा घेतला. काहींनी या कामाला विरोध केला, काहींनी शेतातून पाइपलाईनसाठी जागा नाकारली. अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष सांगितले आणि त्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने कालव्याचे १० किलोमीटरचे रखडलेले काम केवळ एका महिन्यात पूर्ण केले.
खरा कार्यकर्ता कोण ?
डॉ. विखे यांनी जलप्रकल्पाच्या श्रेयाबाबत सुरु असलेल्या राजकीय श्रेयवादावरही भाष्य केले. काहींनी फलक लावून हे पाणी आपणच आणल्याचा दावा केला, परंतु “खरं पाणी कोणी आणलं हे देवालाच ठाऊक” असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर, सगळ्यांशी गोड राहून चालत नाही, जे तसे राहिले त्यांचे ‘पॅकअप’ झाले, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.
राजकीय पुनरागमनाचे संकेत
भविष्यातील राजकीय प्रवासाच्या प्रश्नावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. “मला पदाचा मोह नाही, पण माझ्या सभेला येणाऱ्या लोकांची संख्या पाहता, ती कदाचित सध्याच्या मंत्र्यांच्या सभेलाही मिळत नसेल,” असे म्हणत त्यांनी पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले. राजकारणातील चढ-उतार हे नैसर्गिक असल्याचे नमूद करत, “मलाही घरी बसवण्यात आलं होतं, पण मी पुन्हा उभा राहणार,” असे ठाम वक्तव्य करत त्यांनी आपली तयारी दर्शवली.













