अहमदनगर : जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरू; मविआ आणि महायुतीमधील कोणत्या पक्षाला कोणती जागा ?

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये एकाच जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामुळे जागा वाटप करताना या दोन्ही गटाच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या दोन्ही गटातील घटक पक्षातील पक्षश्रेष्ठींना जागा वाटपा वेळी चांगलाच कस लावावा लागणार आहे. खरे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे अन वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांच्या माध्यमातून राज्यातील काही मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील इतरही पक्षांचे इच्छुक उमेदवार आत्तापासूनच रंगीत तालीम करण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघासाठी आत्तापासूनच विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये एकाच जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामुळे जागा वाटप करताना या दोन्ही गटाच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या दोन्ही गटातील घटक पक्षातील पक्षश्रेष्ठींना जागा वाटपा वेळी चांगलाच कस लावावा लागणार आहे. खरे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे अन वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांच्या माध्यमातून राज्यातील काही मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील उर्वरित पक्षाने अजून उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षात सध्या जागावाटपावर जोरदार मंथन सुरू आहे. मात्र जागा वाटपाच्या आधीच दोन्ही गटातील इच्छुक नेत्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघावर आपला दावा ठोकला जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती मधील कोणते नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शिर्डी : हा महाराष्ट्रातील एक बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ. याचे कारण असे की येथून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत. यावेळी देखील महायुतीकडून ही जागा भाजपाच्या वाट्याला येईल आणि राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा येथूनच निवडणूक लढवतील असे चित्र आहे. मात्र भाजपामधील राजेंद्र पिपाडा हे देखील येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षातील प्रभावती घोगरे यांनी येथून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. घोगरे यांनी यासाठी रंगीत तालीम सुरू केली आहे. यामुळे येथून महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते आणि महायुतीकडून पुन्हा विखे यांनाच उमेदवारी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोपरगाव : महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे हे येथून आमदार आहेत. महायुतीच्या फॉर्मुलानुसार येथून ही जागा पुन्हा एकदा अजित पवार गटालाच मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे वेगळी भूमिका घेण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली आहे. यामुळे जर ही जागा अजितदादा यांच्या गटाला मिळाली तर विवेक कोल्हे शरद पवार गटात जातील आणि येथून पुन्हा एकदा काळे विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळू शकते.

राहुरी : महाविकास आघाडी मधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त तनपुरे हे येथून विद्यमान आमदार आहेत. यावेळी देखील ही जागा महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार गटालाच मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडीकडून दुसरे कोणीच उमेदवार येथून उत्सुक नसल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महायुतीकडून या जागेसाठी भाजपा आग्रही असून भाजपा मध्ये दोन जण इच्छुक असल्याचे समजत आहे.

अहमदनगर शहर : येथून अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा अजित पवार गटालाच येणे अपेक्षित आहे. मात्र या जागेसाठी भाजपा आणि शिंदे गटाने देखील दावा ठोकला आहे. भाजपाचे पदाधिकारी ही जागा आपल्याकडेच यायला हवी अशी आग्रही मागणी करत असून असे घडले नाही तर बंडखोरी होईल असा इशारा देत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी मधीलही तिन्ही पक्ष या जागेसाठी उत्सुक असल्याचे दिसते. यामुळे यंदा संग्राम भैय्या जगताप यांना महायुतीकडून तिकीट मिळते का आणि महाविकास आघाडी कडून कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

नेवासा : ठाकरे गटाचे शंकरराव गडाख हे येथील विद्यमान आमदार आहेत. मात्र महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांमधील कोणीही यातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसल्याचे सध्याचे चित्र आहे. महायुती बाबत बोलायचं झालं तर येथून भाजपाचे दोन जण इच्छुक आहेत. महायुती मधील उर्वरित दोन पक्षांकडून सध्यातरी या जागेसाठी दावा करण्यात आलेला नाही. म्हणून येथून महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार, गडाख यांच्या विरोधात कोण उभे राहणार हे पाहण्यासारखे ठरेल.

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघ म्हणून संगमनेर ची ओळख. हा विधानसभा मतदारसंघ हाय प्रोफाईल म्हणण्याचे कारण म्हणजे बाळासाहेब थोरात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे येथील विद्यमान आमदार आहेत. बाळासाहेब थोरात येथील विद्यमान आमदार असल्याने महाविकास आघाडी कडून इतर कोणीही या जागेसाठी इच्छुक नसल्याचे दिसते. दुसरीकडे महायुतीकडून माजी खासदार अन भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यांनी स्वतः येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्यांचे पिताश्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय विखे यांच्या उमेदवारीला सपोर्ट केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये थोरात यांच्याशी टक्कर घेणारा दुसरा कोणी नेता या जागेवरून दिसतही नाही. यामुळे या जागेवरून महायुतीकडून सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडी कडून थोरात यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झालेत आणि या पराभवामागे बाळासाहेब थोरात यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा होता. दरम्यान याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय दादा येथून निवडणूक लढवतील असे चित्र आहे.

पारनेर : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार हे गेल्यावेळी येथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. सध्या ते नगर दक्षिणचे खासदार असून या जागेवर त्यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे शरद पवार गटाकडून आणखी एकाने या जागेसाठी उमेदवारी मागितलेली आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला जाण्याची शक्यता असल्याने येथून राणी लंके की दुसरं कोणी उभे राहत हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकते असे दिसते. अजित पवार गट आणि शिंदे गट या जागेसाठी इच्छुक नाहीयेत. यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होणार आहे. तथापि उमेदवार कोण राहणार हे आगामी काळात समजणार आहे.

श्रीगोंदा : भारतीय जनता पक्षाचे बबनराव पाचपुते हे येथून विद्यमान आमदार आहेत. यावेळी देखील पाचपुते यांच्याकडेच ही जागा येण्याची शक्यता आहे. मात्र या जागेवर अजितदादा गटाने ही दावा ठोकला आहे. म्हणून महायुतीकडून ही जागा भाजपाला सुटणार की अजितदादा गट सरशी करणार हे पाहण्यासारखे ठरेल. महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर येथून ठाकरे गटाने आणि शरद पवार गटाने दावा सांगितलेला आहे.

कर्जत जामखेड : गेल्या वेळी राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारत येथून शरद पवार गटातील रोहित पवार यांनी विजयी पताका फडकवली होती. यावेळी सुद्धा ही जागा शरद पवार गटाला जाईल आणि येथून पुन्हा एकदा रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार महाविकास आघाडीचे येथील संभाव्य उमेदवार असून महाविकास आघाडी मधील इतर घटक पक्षांकडून या जागेवर कोणताच दावा करण्यात आलेला नाही. महायुती बाबत बोलायचं झालं तर भाजपाचे राम शिंदे हे गेल्या निवडणुकीत उभे होते आणि यंदाही तेच उभे राहतील असे दिसते. कारण की महायुतीच्या इतर पक्षांकडून या जागेसाठी कोणताच दावा करण्यात आलेला नाही.

श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी काँग्रेस पक्षाचे लहू कानडे यांनी विजयी पताका फडकवत विधिमंडळात स्थान पक्के केले आहे. दरम्यान यंदाही ही जागा महाविकास आघाडी कडून काँग्रेसलाच मिळण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र काँग्रेसकडून आणखी एकाने या जागेसाठी उमेदवारी मागितलेली आहे. म्हणून महाविकास आघाडी कडून कानडे की आणखी कोणी दुसरे उभे राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे महायुती मधून या जागेसाठी शिंदे गटाने इच्छा व्यक्त केली आहे.

अकोले : अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे हे येथून विद्यमान आमदार आहेत. यामुळे ही जागा अजित पवार गटाला मिळणे अपेक्षित आहे. मात्र भारतीय जनता पक्ष देखील या जागेसाठी इच्छुक आहेत. शिंदे गट मात्र या जागेसाठी इच्छुक नाही. यामुळे ही जागा महायुतीकडून कोणाला सुटणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पण, अजित गटासाठी सुटली तर पुन्हा एकदा किरण लहामटे हे उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर शरद पवार गटाचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे. मात्र शरद पवार गटाकडून कोण उभे राहणार हे अजून गुलदस्त्यात आहे. शरद पवार गट या जागेसाठी उमेदवाराच्या शोधात आहे.

शेवगाव पाथर्डी : भाजपाच्या मोनिका रांजळे या येथील विद्यमान आमदार आहेत. यामुळे ही जागा भाजपालाच मिळणे अपेक्षित आहे. ही जागा भाजपाला मिळाली तर येथून पुन्हा एकदा मोनिका रांजळे उभ्या राहणार अशी शक्यता आहे. मात्र महायुतीकडून अजित पवार गट देखील या जागेसाठी इच्छुक आहे. माजी आमदार घुले हे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार गटाला ही जागा सुटली नाही, आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो असे संकेत घुले बंधूंनी याआधीच दिलेले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी कडून ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता असून प्रतापराव ढाकणे यांना इथून उमेदवारी दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe