खा. निलेश लंकेंसह शेकडो शेतकरी जनावरांसह आंदोलनात ! कांदा व दूध दरासाठी ‘जनआक्रोश’

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खा. निलेश लंके यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दूध दर, कांद्याचे पडलेले दर यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

Pragati
Updated:
lanke

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खा. निलेश लंके यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दूध दर, कांद्याचे पडलेले दर यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. गायी म्हशींसह शेतकरी आले होते. दरम्यान या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी गेटवर रोखले असल्याचे वृत्त आले आहे. कांदा व दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी निलेश लंके यांनी मोर्चा काढला होता.

खा. निलेश लंके यांचे निवेदन
कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी जनावरांसह शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. खा. लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना निवेदन सादर केले.

राज्यातील कांदा व दुध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचे भाव गेली वर्षभर सातत्याने कोसळत आहेत. सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नसल्याने राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.

सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतू अनुदानाच्या जाचक अटी व शर्तीमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. नुकतीच केंद्र सरकारने दहा हजार टन दुध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दुध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेती तोटयात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालासंदर्भातील चुकीचे धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके, शेती औजारे यांच्या माध्यमातून जी. एस.टी. चा शेतकऱ्यांवर बोजा पडलेला आहे. मात्र देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दुध आणि शेतीमालाच्या हमी भावावरून प्रचंड असंतोष आहे. यासाठी अनेक शेतकरी संघटना विविध आंदोलने करीत आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रूपये दर मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, कांदा व इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी करत शेतकरी,

दुध उत्पादक तसेच विविध शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रकाश पोटे, योगीराज गाडे, किरण काळे, सुनील क्षेत्रे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe