ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली, त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही, पण….; मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवर पलटवार

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कारण की, आता विधानसभा निवडणुकांची चाहूल लागत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे यावेळी पक्षांमधून बंडखोरी वाढण्याची शक्यता अधिक आहे. किंबहुना बंडखोरीला सुरुवात देखील झाली आहे.

दरम्यान याच संदर्भात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटात अनेक नेत्यांनी प्रवेश घेतला आहे. यावर बोलताना पवार यांनी गेल्या दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी गट) पक्षात येणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे.

यातील 80 टक्के लोक हे भाजपामधील आहेत हे विशेष असल्याचे म्हटले होते. आता शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी, ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली. त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच राहत नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. पण, त्यांचा गैरसमज लवकरच दूर होणार आहे.

आगामी विधानसभेसाठी भाजपामध्ये मोठे इनकमिंग होणार आहे. ठाकरे गटातून तर भाजपामध्ये येतीलच, पण शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील ? हा प्रश्न आहे असे म्हणत शरद पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

पुढे बोलताना विखे पाटील यांनी, शरद पवार यांना चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यांनी काय परिवर्तन केलं. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. त्यांनी निळवंडे धरणाचे चार वेळा भूमिपूजन केले.

समन्यायी पाणी वाटपाचे भूत देखील यांच्याच काळात राज्यावर आलं. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार, असे म्हणत शरद पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.