Ahmednagar News : मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे की नाही याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगून मुख्यमंत्री यासंदर्भात येत्या ८ दिवसात सर्वांची बैठक घेणार आहेत.
त्या बैठकीला मनोज जरांगे यांच्या माणसांनाही बोलवा, असे मुख्यमंत्री यांना सांगितले आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर होऊन पुण्याकडे जात असताना काही वेळ पवार नगरला थांबले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. यामध्ये मदन आढाव, स्वप्निल दगडे, मिलिंद जपे, अमोल पवार, गजेंद्र दांगट, विलास तळेकर, सागर भोसले, ऋतुराज आमले, शिवाजी मुंगसे आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने मराठा आरक्षण व ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तुम्ही ज्येष्ठ नेते असल्याने तुमच्यावर समाजाची आशा एकवटली आहे, असे त्यांना सांगितले. याबाबत पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे.
याबाबत येत्या आठ दिवसात ते बैठक घेणार आहेत. काही तांत्रिक अडथळे आहेत, परंतु सरकारमधील सर्व पक्ष मिळून आम्ही मार्ग काढू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा राहील व याबाबत त्यांना सर्व सहकार्य राहील.
कोणतेही राजकारण आमच्याकडून होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळेल व ओबीसी यांनाही त्याबाबत हरकत असणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांकडे सुचवल्याचे पवार म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी तुम्ही गुलाल उडवाल असा आम्हाला शब्द दिला असून लवकरच आरक्षण मार्गी लागेल असे संकेत शरद पवार साहेबांनी दिल्याची माहिती भेट घेतलेल्या मराठा बांधवानी दिली.
साहेबच किंगमेकर !
दरम्यान, आरक्षण प्रश्न महाराष्ट्रात फार धुसमुसत आहे. यावर तोडगा काढण्यात सत्ताधारी अयशस्वी झाले असल्याचे दिसते. अखेर अनेकांनी पवार साहेबांची भेट घेतली.
त्यानंतर आता यावर मार्ग निघण्याचा रस्ता सुकर झाला. म्हणजेच सत्ता कुणाचीही असो कोणत्याही निर्णयात साहेबच किंगमेकर असतात अशी भावना काही कार्यकर्त्यांनी गुपितपणे व्यक्त केली.