Ahmednagar Politics : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा कमळ फुलविले. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले.
त्यामुळे येथील भाजपचे नेते चांगलेच सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता अगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.
यंदा श्रीगोंदेचा विचार केला तर दोन दादा,दोन आण्णा,एक भैय्या आणि एक वहिनी असे अनेक इच्छुक उभे आहेत. या यादीत आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अनुराधा नागवडे, साजन पाचपुते, आण्णासाहेब शेलार असे अनेक लोक इच्छुक आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची महाआघाडी नेत्यांशी सलगी आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे घराण्यावरील निष्ठा जपत काम केले. आता विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी शेलार व त्यांचे पुत्र बेलवंडीचे सरपंच ऋषीकेश शेलार यांनी घोंगडी बैठका घेतल्या आहेत.
विधानसभेसाठी महायुतीकडून बबनराव पाचपुते तर महाविकास आघाडीकडून राहुल जगताप हे मुख्य दावेदार आहेत. मात्र, महायुतीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांच्याकडून राजेंद्र नागवडे यांनीही उमेदवारीसाठी शब्द घेतला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घनश्याम शेलार तर सेना नेते संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना शब्द दिल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत कोण उमेदवार राहणार याची मोठी उत्सुकता आहे.
त्यामुळे आता सर्वच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याने व त्या अनुशंघाने तयारी करत असल्याने उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच अपक्ष देखील काय कमाल करतात ते देखील पाहणे गरजेचे ठरेल.