निलेश लंकेंना महायुतीकडून लढायचे होते, पण विखेंनी प्रचंड त्रास दिल्याने… उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar Politics : खा. निलेश लंके यांचा राष्ट्रवादीमधील फुटीनंतरचा प्रवास सर्वश्रुत आहे. आधी अजित पवार गट त्यानंतर पुन्हा शरद पवार गट व त्यानंतर थेट महायुती उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा लढवत मिळवलेला विजय.

या दरम्यान अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर टीका करत कान टोचले होते. परंतु बऱ्याचवेळा खा. निलेश लंके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्नेह कायम आहेत असेही बोलले जायचे.

दरम्यान आता आगामी विधानसभेच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
निलेश लंके हे महायुतीकडून लढण्यास इच्छुक होते असे पवार यांनी म्हटले आहे. माढा व नगर ही जागा आम्ही मागीतली होती पण ती दिली नाही त्यामुळे या जागा आमच्या हातून गेल्या. नगरमधून निलेश लंके हे लढण्यास इच्छुक होते पण तिकीट मिळाले नाही,

तसेच विखे पाटील यांनी त्यांना प्रचंड त्रास दिलेला असल्यामुळेच ते शरद पवार गटात गेले. त्यांनी लंके यांच्या मित्रांच्या खडी क्रशरला जास्त टॅक्स लावला असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच आगामी विधानसभेला २८८ जागांचा आम्ही स्वतंत्र सर्वे करणार आहोत असेही ते म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन म्हणतात..
अजित दादांच्या या प्रतिक्रियेवर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षात काय चालते किंवा काय करायचे ते पाहतील.

आमच्याकडे तिकीट देण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्या सिस्टीमनुसार तिकीट फायनल होते. त्यानुसारच तिकीट वाटप झाले असल्याचे महाजन म्हणाले.