Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला व यात माजी खा. सुजय विखे यांचा प्रभाव झाला. दरम्यान या निकालानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करावी यासाठी अर्ज केला होता.
आता या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आल्या आहेत. आता आलेल्या या सूचनेनुसार विखे पाटील यांनी ज्या मतदान केंद्रावर आक्षेप घेतलेला आहे त्या ठिकाणीच्या मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया (मॉकपोल) पार पडणार आहे.
माजी खा. सुजय विखे यांनी तब्बल ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता. त्यामुळे या सर्वच मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. तशा सूचना मिळाल्या आहेत.
मतदान प्रक्रिया (मॉकपोल) राबविण्यासंदर्भात सूचना असणारे पत्र भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पाठवले होते. यानंतर सायंकाळी जिल्हा निवडणूक विभागाकडे हे पत्र पोहोचले होते.
‘अशी’ पार पडेल प्रक्रिया
निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दिवशी ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील. यानंतर आक्षेप घेतलेल्या चाळीस यंत्राची मेमरी रिकामी केली जाईल.
एका मशीनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मते टाकता येणार आहेत. किती मते करायचे हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना आहेत. यानंतर शेजारीच तयार केलेल्या मतमोजणी कक्षात पेपर स्लीप (व्हीव्हीपॅट) आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे.
ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगरानीत व उमेदवारांसमोर पार पडणार आहे.
‘या’ ४० मतदान केंद्रांची होणार तपासणी
यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातील ५, नगर शहर ५, शेवगाव-पाथर्डी ५, कर्जत-जामखेड ५, पारनेर १०, श्रीगोंदा १० या केंद्रांचा समावेश आहे.