Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चांगलेच ढवळून निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा पुण्यात आले होते.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी देखील आता प्रतिउत्तर दिले. त्यानंतर राजकीय वातावरण आरोपप्रत्यारोपांनी तापायला लागले आहे.
आता एकेकाळी पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते असा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले विखे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवारांवर आरोप केल्यानंतर पवारांनी देखील प्रत्यारोप केले. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार शरद पवार आहेत, असा आरोप पवार यांच्यावर केला आहे.
तर सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री असल्याचे शरद पवार यांनी म्हणत टीकास्त्र सोडले. आता याच वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा पलटवार केलाय.
विखे पाटील म्हणाले, त्यांनी अशी टीका करणे योग्य नसून एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते. मग हेच राजकारण करत बसायचं का? असा सवालही त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात कलम ३७० हटवण्यात आले, यापूर्वी कधी असे झाले नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान सध्या दूध दर, कांदा प्रश्न या मोठ्या समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यावर देखील शासन योग्य तो मार्ग काढत असल्याचे ते म्हणाले. तसेच विधानसभेला महायुतीचेच सरकार येईल असा पुनरुच्चारही त्यांनी केला.