Ambadas Danve : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून मोठे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या फेसबुक अकाऊंटचीही तपासणी व्हावी. आमदाराचा व्हिडिओ डुप्लीकेट असेल तर जरुर कारवाई करा. पण तो ओरिजिनल असेल तर खासगी संबंध ज्याच्या त्याच्या घरी, सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर त्याच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच ते म्हणाले गृहमंत्रालय आणि सरकार गुन्हे करणाऱ्यांच्या बाजूने आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की मी बिलकूल एकतर्फी कारवाई करणार नाही.
पण एका आमदाराच्या बंदुकीतून गोळी झाडली जाते. त्यानंतर पोलीस म्हणतात की, ‘गोळी झाडली तेव्हा बंदूक आमदाराच्या हातात नसावी. मग आपली रिव्हॉल्व्हर दुसऱ्याच्या हातात देणे हा गुन्हा ठरत नाही का? असेही ते म्हणाले.
तसेच याप्रकरणी प्रकाश सुर्वे हे एकदाही माध्यमांसमोर आलेले नाहीत. हाच मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला. व्हिडिओतील जे आमदार आहेत त्यांनी पोलिसांत काही तक्रार केली आहे का, हे पाहिले पाहिजे. त्या पुरुष आमदाराचीही बदनामी झाली आहे. पुरुषाची बदनामी होत नाही का? असेही ते म्हणाले.