Chief Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर मोठं भाष्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे पुण्यात सध्या याचीच चर्चा सुरू आहे. निलेश लंकेंनी यांनी अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायच आहे. मी माझ्या बऱ्याच भाषणांत सांगतो, अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हा खात्री आहे. यासाठी आपल्याला काम करायचं आहे.

दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचे काम येत्या वर्षभरात करायचे आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
तसेच जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील असेही लंके यांनी म्हटले आहे. दरम्यान लंके यांच्या या वक्तव्यामुळे इतर महाविकास आघाडीतील नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी २०२४ ला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील असे सांगितले आहे. तसेच शिंदे गटाकडून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याचे नाव घेतले जाते. यामुळे सर्वच पक्षात 2024 मध्ये मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याबाबत वक्तव्य केले होते. यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.