मुंबईतील वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून सातत्याने धमक्या मिळत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनावट व्हिडीओ आणि छायाचित्रे पाठवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.
या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत करुणा मुंडे यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

करुणा मुंडे यांनी शनिवारी कुटुंब न्यायालयात नव्या अर्जाद्वारे आपली कैफियत मांडली. त्यांच्या मते, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत धनंजय मुंडे यांच्याकडून दररोज जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
याशिवाय, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे पाठवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये करुणा मुंडे प्रत्यक्ष नसल्या, तरी त्यांना त्यात असल्याचे दाखवून त्यांचा मानसिक छळ केला जात आहे. या प्रकारामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला आणि मानसिक स्थैर्याला मोठा धक्का बसत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याशिवाय, करुणा मुंडे यांनी पोटगीच्या रकमेसंदर्भातही मागणी केली आहे. न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २०२२ पासून आतापर्यंत ६० लाख रुपये पोटगीची रक्कम थकीत असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
ही रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडून वसूल करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. तसेच, त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यास मनाई करण्यासाठीही त्यांनी स्वतंत्र अर्ज सादर केला आहे. हे सर्व अर्ज करुणा मुंडे यांनी त्यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केले आहेत.
न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांनुसार, धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी लग्न झाले नसल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचे नातेसंबंध लग्नाच्या कायदेशीर व्याख्येत बसत असल्याचे स्पष्ट केले. कारण, करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या दोन मुलांना जन्म दिला असून, एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नव्हते.
त्यामुळे घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत करुणा मुंडे यांना दिलासा मिळण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. याच आधारावर, करुणा आणि त्यांच्या मुलांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते.