Hasan Mushrif : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अडचणीत आले आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
तब्बल साडेनऊ तास ईडीने ही झाडाझडती केली. यानंतर 24 तास उलटले तरी मुश्रीफ यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी कुणाशीही संपर्क साधलेला नाही. यामुळे मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने मुश्रीफ गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पहाटेच ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नाकारला जात होता.
यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. नलावडे साखर कारखान्याप्रकरणी काल ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा मारला. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनीही ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला.
वारंवार धाडी मारल्या जात आहेत. त्यापेक्षा एक करा. आम्हाला गोळ्या तरी घाला, असा संताप त्यांनी व्यक्त केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कारवाईची माहिती आधीच कशी असते? असा प्रश्न मुश्रीफ समर्थकांनी उपस्थित केला आहे.