महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आ. रोहित पवार हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे राज्यभर विविध जिल्ह्यात दौरे सुरु असतात.
दरम्यान सभा बैठकांत आरोप प्रत्यारोपही सुरु असतात. दरम्यान त्यांच्यावर आता एका आमदाराने मोठा घणाघात केला आहे. माझा नाद केला तर रोहित पवारांना गारेगारचा गाडा लावून देईन असा इशाराच दिला आहे.
तसेच रोहित पवारांनी जमिनी हडप केल्याचाही आरोप केलाय. आमदार राजेंद्र राऊत यांनी हा घणाघात केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी बार्शीच्या मेळाव्यात बार्शीत दडपशाही असल्याची टीका आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर केली होती. त्याला आता राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले आमदार राजेंद्र राऊत ?
रोहित पवार तुम्ही पुण्यामध्ये किती जमिनी हडप केल्या, कोणत्या बँकांना टोप्या घातल्या, तुमचे कारखाने कसे उभे राहिले, तुम्ही काय दिवे लावले हे सर्व आम्हाला माहिती आहे. माझा नाद करू नका, ज्यांनी माझा नाद केला.
त्यांना मी गारेगारचे गाडे लावून दिले आहेत. तुम्हीपण गारेगारचा गाडा लावाल, असा इशारा आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला. बारामतीचा विकास करा पण इतर तालुके कोणी दुष्काळी ठेवले हे रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारले असते तर बर झाले असते.
माझ्यावर टीका करताना जमिनीचा विषय काढला. माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय काढला. मराठी माणसाने व्यवसाय करणे हा गुन्हा नाही. कोणताही उद्योग न करता तुमची प्रॉपर्टी कशी वाढली, कुठे कुठे कमिशन आणि आतापर्यंत काय काय खाल्ले, त्याचे आधी उत्तर द्या.
आम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे आहात. इथे येऊन दुसऱ्यांच्या नावाने ओरडत आहात. या बार्शीत कोणाची गुंडगिरी होती आणि कोणी संपवली हे सर्वांना माहिती आहे असेही ते म्हणाले.
आ. रोहित पवारांचाही पलटवार, बार्शी शहरालगत चारशे एकर जमीन कोणाची ?
राऊत यांनी दिलेल्या प्रत्युत्तर नंतर आमदार रोहित पवार यांनी पुण्यात बोलताना म्हटले आहे की, बार्शीच्या आमदारांना मला सांगायचे आहे. तुम्ही काय काढता माझे कुठला व्यवसाय कुठे आहे, ईडी माझे बघतेयच ना… मग ईडीला भाजपनेच जबाबदारी दिली आहे ना?
मग ईडी त्या बाबतीत लक्ष घालेल. बार्शी शहराच्या चारी बाजूंनी ४०० एकर जमीन कोणाची आहे, माझ्या प्रॉपर्टीचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्याबाबत ईडीला सर्व माहिती आहे. जे दुनियेला दाखवायचे ते दाखवा. आम्ही ईडीला घाबरत नाही, असे पवार म्हणाले