Imtiaz Jalil : ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
ते म्हणाले, इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचे उदात्तीकरण करतात. औरंगजेब हा देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही होता. देशद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचे सदस्यत्व रद्द केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आजच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी औंरगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या नामांतराविरोधात येथील खासदार आंदोलन करत असताना आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे.
शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. त्यामुळे याचं वाईट वाटायचं कारण काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. औरंगजेबाचे तुम्ही काय वंशज आहात का? असेही ते म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या येथे नको. त्यामुळे ही कबर काढून घ्यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.