Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रचारासाठी अवघ्या काही तासांचा काळ बाकी राहिला आहे. आज सहा वाजेपासून प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे. कर्जत जामखेड मधून यावेळी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
रोहित पवार हे कर्जत जामखेड चे विद्यमान आमदार आहेत. मात्र यावेळी रोहित पवारांना आपली सीट वाचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण की गेल्या काही दिवसांच्या काळात रामा भाऊंची मतदारसंघातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
रोहित पवारांचे अनेक जवळचे नेते आणि पदाधिकारी आता रामाभाऊंच्या सोबत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या भूमिपुत्र चळवळीच्या माध्यमातून तरुण वर्ग त्यांच्यासोबत जोडला गेला आहे. विधान परिषद आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात मोठमोठी कामे केलीत.
शिवाय, रोहित पवारांच्या आधी आमदार असताना आणि मंत्री असतानाही त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात हातभार लावला. यामुळे सध्या तरी रामाभाऊ यांची प्रचारात आघाडी दिसत आहे. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच मिरजगाव येथे एक प्रचार सभा घेतली.
या प्रचार सभेत बोलताना गडकरी यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला. गडकरी म्हणालेत की, लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झालीत आणि लाडू भलतेच वाटत आहेत.
म्हणजे मी मंत्री, रस्ते मी केले, आमच्या पक्षाचे प्रा. राम शिंदे, आम्ही काम केलं आणि गावात भलतेचं लोक लाडू वाटत आहेत. नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याने गडकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत हा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
पुढे बोलताना गडकरी यांनी ज्यावेळी विकासाच्या कामावर मत मागता येत नाही त्यावेळी जनतेच्या मनात विष पेरले जाते. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत BJP आघाडीला म्हणजे NDA ला 400 जागा मिळाल्यात तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार.
मात्र आम्ही बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, कुणाला बदलूही देणार नाही आणि कुणाचे बदलवण्याची हिंमत देखील नाही, असं म्हणत भाजप नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.