कोल्हे कोपरगाव विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत ? स्नेहलता कोल्हे म्हणतात, कधी-कधी दोन पावले मागे जाणे…….

राज्यातील राजकीय घडामोडींना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. राज्यातील इतरही पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करणार आहेत. या अनुषंगाने इच्छुकांनी नेत्यांच्या गाठी भेटी सुरु केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने अन यामुळे महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Kopargaon News

Kopargaon News : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. हळूहळू राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची नावे सार्वजनिक केली जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आणि आज अजित पवार गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलीत.

राज्यातील राजकीय घडामोडींना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. राज्यातील इतरही पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करणार आहेत. या अनुषंगाने इच्छुकांनी नेत्यांच्या गाठी भेटी सुरु केल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने अन यामुळे महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत.

यामुळे एकाच जागेवर महाविकास आघाडीमध्ये आणि महायुती मध्ये अनेक जण इच्छुक असल्याचे दिसते. परिणामी, अनेक ठिकाणी बंडखोर होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील अशीच परिस्थिती आहे.

या ठिकाणी महायुतीमधील भारतीय जनता पक्षात बंडखोरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. खरे तर कोपरगावची जागा ही अजित पवार यांच्या गटाला गेली असून या ठिकाणी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. मात्र या जागेवर भाजपाचे विवेक कोल्हे हे देखील उत्सुक होते.

खरे तर कोपरगाव म्हटले की काळे आणि कोल्हे यांच्यातला पारंपारिक राजकीय संघर्ष आठवतो. गेल्या वेळी देखील स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांच्यात लढत झाली होती. पण या निवडणुकीत कोल्हे आणि काळे एकाच गटात म्हणजेच महायुतीचा भाग आहेत. यामुळे कोल्हे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

म्हणून ते वेगळी भूमिका घेतील आणि शरद पवार गटात जाऊन काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशा चर्चा जोर पकडत होत्या. त्यानुसार त्यांनी चाचपणी देखील सुरू केली होती. विवेक भैय्या स्वतः शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.

यामुळे कोल्हे हाती तुतारी घेऊन पुन्हा एकदा काळे यांना आव्हान देणार असेच दिसत होते. मात्र भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. त्यांनी कोल्हे यांनी कोणतीही वेगळी भूमिका घेण्याआधी स्नेहलता कोल्हे यांची भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

फडणवीस यांची ही मनधरणी आता कामी येत असल्याचे दिसते. कारण की कोल्हे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी समोर आली आहे. प्रसार माध्यमांमध्ये या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्यानंतर आता स्वतः स्नेहलता कोल्हे यांनी देखील एक पोस्ट टाकली आहे.

यात त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असते, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विवेक कोल्हेंच्या कार्याची दखल घेतली असल्याचे म्हटले आहे.

यावरून ते विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संकेत मिळतं आहेत. कोपरगावची जागा अजित पवार गटाकडे गेल्याने कोल्हे यांची राजकीय कोंडी झाली होती. ही राजकीय कोंडी दूर करण्यासाठी त्यांनी इतर पर्यायी मार्गाचा विचार देखील सुरू केला होता.

मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी यावर डॅमेज कंट्रोल केले. दरम्यान, कोपरगावचा तिढा सोडवण्यात भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यश आल्याचे आता कोल्हे यांच्या पोस्ट वरून सिद्ध होत आहे. यावरून यंदा काळे विरुद्ध कोल्हे असा सामना पाहायला मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe