Kopargaon Vidhansabha : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काळे आणि कोल्हे हे दोन राजकीय परिवार शुगर लॉबी मधून येतात. शुगर लॉबी मधून येत असल्याने या दोन्ही परिवाराचा मतदारसंघातील गावागावांमध्ये घट्ट जनसंपर्क आहे. काळे आणि कोल्हे हे परंपरागत राजकीय विरोधक राहिले आहेत.
गत निवडणुकीत कोपरगावात भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काळे यांनी बाजी मारली होती. मात्र मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.

त्यावेळी काळे यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. अर्थातच काळे आणि कोल्हे हे एकाच गटात आले आहेत. हे दोन्ही परंपरागत राजकीय विरोधक आता महायुतीचा भाग आहेत. दरम्यान, महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना महायुतीकडून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे कोल्हे हे नाराज आहेत. म्हणून ते भाजपा सोडून शरद पवार गटात जातील आणि काळे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवतील असे म्हटले जात होते.
महत्त्वाचे म्हणजे कोल्हे यांनी या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी देखील सुरू केली होती. त्यांनी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या समवेत त्यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
शरद पवार आणि युवा नेते विवेक कोल्हे हे एकत्रित दिसल्याने राजकीय विश्लेषक कोल्हे हाती तुतारी घेऊन काळे यांच्या विरोधात दंड थोपटतांना दिसतील असे सांगत होते. मात्र कोल्हे यांच्या या भूमिकेनंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेत.
त्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना मुंबईला बोलवून त्यांच्या समवेत या मुद्द्यावर चर्चा केली. कोल्हे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. दरम्यान फडणवीस यांचा हा प्रयत्न आता यशस्वी झाला असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण की कोल्हे परिवाराने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी समोर आली आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आपल्या राजकीय भवितव्याचा विचार न करता निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हे परिवाराच्या या निर्णयामुळे मात्र राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोल्हे यांच्या या निर्णयामुळे कोपरगाव तालुक्यात अगदीच भयाण शांतता पसरली आहे. काळे-कोल्हे यांचा राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला परिचित आहे. या मतदार संघात काळे विरुध्द कोल्हे असा संघर्ष कायम असतो, मात्र अचानक कोल्हे यांनी यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आमदार आशुतोष काळे यांच्या आमदारकीचा मार्ग सुखकर झालाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.
कारण की काळे यांना आता महायुतीमधून कोणाचेच आव्हान राहणार नाही. शिवाय काळे यांच्या विरोधात जर कोल्हे नसतील तर विरोधातलं आव्हान हे फारसं तुल्यबळ राहणार नाही. एकंदरीत महायुतीकडून काळे हेच वन मॅन आर्मी उमेदवार असतील. तथापि आज कोल्हे यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. कोल्हे परिवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपली भूमिका जनतेसमोर मांडणार आहे.
यामुळे कोपरगावात आता पुढील समीकरण कसे राहणार, काळे यांच्या विरोधात कोल्हे सारखा तुल्यबळ नेता महा विकास आघाडीला गवसणार का ? काळे यांना आपला गड शाबूत राखण्यात खरंच फारशी मेहनत करावी लागणार नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.